यावलमध्ये स्ट्राँग रूमला प्रशासनसह उमेदवारांकडून 24 तास पहारा
मोबाईल जामर लावण्याची मागणी : सीसीटीव्हीची करडी नजर
यावल (5 डिसेंबर 2025) : यावल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. संपूर्ण ईव्हीएम यंत्र सील करून यावल येथील तहसील कार्यालयाच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून 24 तास पहारेकरी तसेच सीसीटीव्ही कॅमेर्याची नजर असतांनादेखील शिवसेना उबाठाच्या उमेदवारासह भाजपच्या उमेदवाराकडून या ठिकाणी 24 तास पहारा देण्यासाठी पाच जण नियुक्त करण्यात आले. तशी परवानगीदेखील तहसीलदारांकडून त्यांनी घेतली. या परिसरात मोबाईल जामर लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
शांततेत पार पडली मतदान प्रक्रिया
यावल पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरिता चार तर नगरसेवकांच्या 22 जागांसाठी 74 उमेदवार रिंगणात होते. यात मंगळवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ईव्हीएम यंत्र हे सील करून यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयामध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. या स्ट्राँग रूमला प्रशासनाकडून पहारा लावण्यात आला असलातरी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांच्या वतीने तीन लोकांची अधिकृतरित्या या ठिकाणी पहारा देण्यासाठी परवानगी घेण्यात आली. हे तीन लोक हे येथे 24 तास पहारा देत आहे.


भाजपाकडूनही पहारा
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांच्या वतीने देखील या ठिकाणी पहारा देण्यासाठी दोन लोक ठेवण्यात आले आहे. 24 तास या ठिकाणी प्रशासनासह उमेदवारांच्या वतीने देखील पहारा दिला जात आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत हा पहारा या ठिकाणी कायम ठेवला जाणार आहे.
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्याकडून निवेदन
माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उबाठाचे उमेदवार अतुल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदन देत तहसील कार्यालयाच्या या स्ट्राँग रूम सह परिसरात मोबाईल जामर लावण्याची मागणी केली. या भागामध्ये इंटरनेट देखील नियमित बंद ठेवले जावे, अशी त्यांची मागणी आहे.
सीसीटीव्ही कॅमेर्याची 24 तास नजर
यावलच्या स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही कॅमेरे चारही बाजूने नजर ठेवत आहे. 24 तास हे सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी सुरू असून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या दालनात त्याचा एक्सेस देण्यात आला आहे. तसेच हत्यार असलेले स्थानिक व बाहेरील असे सहा कर्मचारी येथे कायम नियुक्त आहेत.
आठ आठ तासांच्या शिफ्टमध्ये पहारा
भाजपाकडून दोन आणि शिवसेना उबाटाकडून 3 असे पाच जण पहारा देण्यासाठी नियुक्त आहे. हे सर्वजण प्रत्येकी आठ तास असे आलटून पालटून या ठिकाणी 24 तासाचा पहारा देत आहेत.







