दिलासा नाहीच : मतमोजणी 21 डिसेंबरलाच !

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर : विरोधातील याचिका फेटाळली


मुंबई (5 डिसेंबर 2025) : पालिका निवडणुकीतील मतमोजणी 21 डिेसेंबरच्या आधी घ्यावी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर शुक्रवार, 5 डिसेंबरच्या सुनावणीकडे जनतेचे लक्ष लागले होते मात्र सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मतमोजणी थेट 21 डिसेंबरलाच करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.

मतमोजणीला अनपेक्षित अडथळा
राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मतमोजणीला अनपेक्षित अडथळा आला असून, हा प्रश्न आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती. या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे प्रकरणी सुनावणी पार पडली.

सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत 264 नगरपालिका व नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने मतदानानंतर होणार्‍या मतदानोत्तर चाचण्यांचे निकालही 20 डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर पुढील अर्धा तास होईपर्यंत जाहीर करता येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे मतमोजणीसाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा वाढली असली, तरी सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर होणार असल्याने राजकीय क्षितिजावर उत्सुकता अधिक वाढली आहे. राज्यातील स्थानिक सत्तेचे चित्र कोणत्या दिशेने बदलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

21 डिसेंबर रोजी कोणाचे वर्चस्व ठरेल
अंतिम निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. राज्यात सर्व नगरपालिका व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे. या निर्णयामुळे आता कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा प्रभाव निवडणुकीवर पडणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने घेतली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण गरम झाले असून 21 डिसेंबर रोजी कोणाचे वर्चस्व ठरेल? कोणते पक्ष स्थानिक सत्तेत परत येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !