महाराष्ट्र झाले गुंडांचे राज्य ; सरकारने लाडका कंत्राटदार नवी संकल्पना राज्यात आणली : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप
Maharashtra has become a state of goons; The government has brought a new concept of beloved contractors to the state: Congress leader Vijay Wadettiwar’s allegations मुंबई (6 डिसेंबर 2025) : भाजपमध्ये हिरोगिरी सुरू असून त्यांच्यामुळेच महिला अत्याचारांचे प्रकार वाढले आहे. हे महाराष्ट्रासाठी खूप घातक आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे तो याच गुन्हेगारांना पाठिशी घातल्याने झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, टेंडर प्रक्रिया ही केवळ नावापूरतीच राहिली आहे. यातून एक लाख 67 हजार कोटींचे कामे देण्यात आली. याचे 20 टक्के पैसे सत्ताधार्यांनी कमिशन म्हणून घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीमधील दोन्हीही घटक पक्ष हे भाजपच्या ताटाखालील मांजर बनले आहेत, ते म्हणतील तसे दोन्हीही पक्ष वागती त्यामुळे भाजपला कुणीही थांबवू शकत नाही. मुंबई महापौर पदावर भाजपचा माणूस बसवायचा आहे हा दिल्लीतील ‘आका’ने त्यांना आदेश दिला आहे.
कुंभमेळ्याचे बजेट मलिद्यासाठी फुगवले
विजय वडेट्टीवार म्हणाले की, कुंभमेळ्याचे बजेट मलिदा खाण्यासाठी फुगवण्यात आले आहे. आपली माणसं नेमत पैसे गोळा करायचे आणि त्यातून निवडणूक जिंकायचे असे सुरू आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपने एका मतासाठी 50 हजार रुपये दिल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. एका मतासाठी जर भाजप 50 हजार रुपये देत असेल तर हा देश किती लुटून खाल्ला आहे याचे ते उदाहरण आहे.
संविधान बदलण्याची कोणाची औकात नाही
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्तेसाठी काहीही करायचे पैसे वाटायचे आणि पुन्हा पैसे खायचे आणि देश लुटून खायचा हे सत्ताधार्यांचे सुरू आहे. संपूर्ण व्यवस्था बिघडवली आहे. त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नसल्याने हिंदू-मुस्लीम, मंदिर, मशीद, भारत- पाकिस्तान असे लोकांना वाटून संविधान संपवण्याचे षड्यंत्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं जीवंत आहे तो पर्यंत संविधान बदलण्याची कोणाची औकात नाही.

