अट्टल खिसेकापू जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव (10 डिसेंबर 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल खिसेकापूंना अटक केली आहे. या आरोपींकडून चोरी केलेली 15 हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
काय घडले जळगावात ?
यावलचे रहिवासी शेख कलीम शेख इसाक (50) हे 1 डिसेंबर रोजी पत्नीच्या औषधोपचारासाठी जळगावातील रुग्णालयात आले. औषधे घेऊन घरी परतण्यासाठी ते जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथून बसमध्ये चढत असताना, त्यांच्या पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 15 हजार चोरले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


फुटेजनंतर आरोपी जाळ्यात
पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पथकातील अंमलदारांनी गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपींची ओळख पटवली. या माहितीच्या आधारावर, रजा कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले तीन आरोपी निष्पन्न झाले. हमीद अय्युब खान (22, रा.बॉम्बे बेकरी जवळ, अक्सा नगर, जळगाव), समीर खान अफसर खान (22, रा.शेरा चौक, जळगाव), शोहेब मेहमुद पटेल (23, रा.शेरा चौक, रजा कॉलनी, जळगाव) या तिघांनाही अटक करण्यात आली.
यांनी आवळल्या मुसक्या
हीी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, एएसआय विजयसिंग पाटील, किरण पाटील, गिरीष पाटील, प्रदीप चौधरी, विशाल कोळी आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार गिरीष पाटील करीत आहेत.







