दहशतवाद्यांकडून पैसे घेतल्याची भीती घालत भुसावळातील सेवानिवृत्ताला 80 लाखांचा गंडा


Retired man in Bhusawal duped of Rs 80 lakhs, fearing he had taken money from terrorists भुसावळ (12 डिसेंबर 2025) : दहशतवाद्यांकडून पैसे घेतल्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती घालून भुसावळातील वीज वितरण कंपनीच्या 86 वर्षीय वयोवृद्धाला सायबर भामट्यांनी तब्बल 80 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, फसव्या व्हॉटसअ‍ॅप कॉलपासून सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेने केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
भुसावळ शहरातील रहिवासी असलेले 86 वर्षीय तक्रारदार हे विद्युत वितरण कंपनीतून सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या मोबाईलवर 27 ऑक्टोबर रोजी एक अनोळखी फोन आल्यानंतर त्याने डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर थोड्या वेळाने याच व्यक्तीने तुमचा फोन वरिष्ठ अधिकार्‍यांना जोडून देण्याचे सांगितले. यानंतर संबंधित भामट्याने चौधरी यांना व्हिडिओ कॉल करून मी मुंबई कुलाबा पोलिस ठाण्यातून पोलिस अधिकारी विजय त्रिपाठी बोलत असल्याचे सांगत तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तक्रारीत तुमच्या मोबाईल नंबरद्वारे अनेक लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे भासवले. फसवणुकीचा प्रकार 28 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 2025 काळात घडला.

गुन्ह्यात सहभाग असल्याची दाखवली भीती
संजय पिसे म्हणून आणखी एका भामट्याने चौधरी यांना संपर्क करत तुमच्या विरुद्ध अंधेरी ईस्ट येथे कॅनरा बँकेत खाते उघडून त्या खात्याचा वापर आतंकवादी संघटनांनी केला असल्याचे कागदपत्र सोशल मिडीयावर पाठवले. मनी लाँण्डरिंग व अतिरेकी संघटनांकडून पैसे घेतल्याचा गुन्हा कुलाबा पोलिसात दाखल असून अन्य संशयीतांचे फोटो पाठवून तक्रारदाराचाही आरोपींमध्ये समावेश असल्याची भीती घालण्यात आली व गुन्ह्यात वॉरंट निघाल्याने अटकेची भीती घालून हा प्रकार कुणालाही सांगायचा नाही, असे म्हणत न केलेल्या गुन्ह्याचा लेखी कबुलनामा लिहून घेण्यात आला तसेच वेगवेगळ्या बँक खात्याद्वारे तब्बल 80 लाख पाच हजार 416 रुपये घेवून ही सर्व रक्कम रिझर्व्ह बँकेच्या खात्यात तुम्हाला टाकून द्यावी लागेल तेथून या रकमेची पडताळणी करण्याच्या नावाखाली तीन खात्यांमध्ये रक्कम घेण्यात आली. आरोपींनी चौधरी यांना भारतीय रिझर्व बँकेचा सही शिक्का असलेले पत्र पाठवले.

पैसे दिल्यानंतर त्यांचे फोनही बंद झाले व पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याची खात्री होताच सुखदेव चौधरी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !