पृथ्वीराज चव्हाणांचा दावा ; 19 डिसेंबरला देशात राजकीय भूकंप : मराठी माणूस होईल पंतप्रधान
Prithviraj Chavan’s claim : A political earthquake will strike the country on December 19; a Marathi man will become Prime Minister. पुणे (14 डिसेंबर 2025) : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या धक्कादायक दाव्याची देशभरात चर्चा आहे. आगामी 19 डिसेंबर रोजी देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणसाची वर्णी लागणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे शिवाय अमेरिकेतील एका इस्त्रायली गुप्तहेराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची माहिती बाहेर येणार असल्याने अनेक बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. चव्हाण यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
ट्वीटचा सविस्तर केला खुलासा
पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो’, अशा आशयाचे ट्वीट केले होते. हे ट्वीट तुफान व्हायरल झाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज त्यांच्या ट्वीटचा सविस्तर खुलासा केला.

नेमके काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जगात बरेच काही चालले आहे. मध्यंतरी मी एक ट्वीट केले होते. ते ट्वीट खूप व्हायरल झाले होते. मी म्हटले होते की, कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. मला अनेकांचे फोन आले. याचा अर्थ काय आहे. कोण म्हटले तुम्ही होणार आहात का? तर कुणाला याची पार्श्वभूमी माहिती नव्हती. आता मराठी माणूस होणार म्हणजे, आता बसलेल्या माणसाला बाजूला व्हावे लागेल, मी आधीच अधोरेखीत केले आहे, नाव न घेता. बहुतेक बदल घडण्याची शक्यता आहे. बदल घडला तरी काँग्रेसचा माणूस हा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे तेवढं बहुमत नाही. सत्तेत असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी होईल आणि तो कदाचित ‘मराठी माणूस’ असू शकतो. 19 डिसेंबरला हे घडेल, असा माझा अंदाज आहे.
‘इस्त्रायली गुप्तहेरा’चे कनेक्शन
या राजकीय भूकंपामागे आंतरराष्ट्रीय कारण असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, अमेरिकेत एक ‘अॅमस्टिन’ नावाचा माणूस होता, जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने मोठभमोठ्या बंगल्यांमध्ये कॅमेरे लावून लोकांचे खाजगी क्षण टिपले आहेत. अमेरिकन संसदेने कायदा केला असून त्यावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सही आहे. त्यानुसार 19 डिसेंबरला या प्रकरणातील 75 हजार फोटो आणि 20 हजार ई-मेल्सचा डेटा जाहीर होणार आहे. हा डेटा सर्च करता येणार असून यात कितीही मोठा माणूस असला तरी त्याला संरक्षण मिळणार नाही, असे अमेरिकन संसदेने स्पष्ट केले आहे.

