एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला : मुंबईची तिजोरी लुटणारे ‘रहमान डकैत’ ; आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर !
Eknath Shinde’s taunt to Thackeray : Those who looted Mumbai’s treasury are ‘Rahman dacoits’; we are the masters who will teach them a lesson! नागपूर (14 डिसेंबर 2025) : हिवाळी अधिवेशनाचे रविवारी नागपूरात सुप वाजले मात्र अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, पण तिजोरी कधीही धुतली नाही मात्र काहींनी कोविड असो वा मिठी नदीचे काम प्रत्येक ठिकाणी डल्ला मारला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रहमान डकैत’ असलेतरी अशा डकैतांना पाणी पाजणारे आम्ही ‘धुरंधर’ असल्याचे ते उद्धव ठाकरेंचे नाव न घेता म्हणाले.
‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, माझे नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस उगवत नाही आणि मावळतही नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही मला घटनाबाह्य म्हटले जाते. पण मी टीकेला टीकेने नाही तर कामाने उत्तर देतो. लोक मला डीसीएम म्हणतात, याचा अर्थ ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असा आहे.

मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकणार नाही
शिंदे यांनी स्पष्ट केले की, सूर्य-चंद्र आले किंवा कुणाच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही. उलट मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करत आहोत.
मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी दिनी 23 जानेवारी निमित्त योजना पुष्प अर्पण करणार आहोत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र आम्ही लावले. मी मुख्यमंत्री झाल्यावर आयुक्तांना बोलवून निर्णय घेतला आणि आपण 300 एकरचे सेंट्रल पार्क आज करतोय. पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी आम्ही राज्यातील सर्व शहरांतील गार्डनसाठी पैसे दिले,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडकी बहीण योजना बंद पडेल, अशी आवई उठवली जात होती. पण अजूनही सुरू आहे. जे कोर्टात गेले ते, हरले. पण कोणीही ‘माई का लाल’ आला तरी लाडक्या बहिणीची ओवाळणी बंद होणार नाही. त्यांना 2100 रुपये देणार म्हटले तर देणारच, अशी ठाम ग्वाही एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.

