उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन 4 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौर्यावर
जळगाव जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व तयारी बैठक
जळगाव (30 डिसेंबर 2025) : भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हे रविवार, 4 जानेवारी 2026 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर येत असल्यची शक्यता आहे या दौर्याच्या अनुषंगाने आवश्यक पूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची पूर्वतयारी संदर्भात बैठक आयोजित केली.
यांची होती उपस्थिती
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, उपवनसंरक्षक राम धोत्रे, अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

असा असेल दौरा
जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले की, उपराष्ट्रपती यांचे 4 जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता रेल्वेमार्गे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होईल. त्यानंतर अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयान करतील. तेथून सकाळी आठ वाजता ते अजिंठा छत्रपती संभाजी नगराकडे प्रयाण करतील. या प्रस्तावित दौर्यासाठी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.
रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता
दौर्याच्या पूर्वतयारीसंदर्भात पोलीस विभागाने रेल्वे स्थानक परिसर तसेच शहरात पुरेसा बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे. जळगाव महानगरपालिकेने रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, अतिक्रमण हटविणे आदी कामे तात्काळ पूर्ण करावीत. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता व वाहतूक नियोजनाबाबत सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी. नॅशनल हायवे यंत्रणेने ज्या ठिकाणी रस्ते नादुरुस्त आहेत त्या ठिकाणी तात्काळ रस्ते दुरुस्त करावेत,जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या.
यांचीदेखील बैठकीला उपस्थिती
या बैठकीस रेल्वे, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे जळगाव महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, विद्युत वितरण कंपनी, अन्न व औषध प्रशासन आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
