70 वर्षांच्या वृद्धाला प्रथमच ओळखीचा अधिकार मिळाला !

आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनातून ‘शासन आपल्या दारी’ शिबिरात माणुसकीचे जिवंत दर्शन


यावल (30 डिसेंबर 2025) : रावेर विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली मुंजलवाडी येथे आयोजित शासन आपल्या दारी तक्रार निवारण शिबिरात एक अत्यंत हृदयस्पर्शी व सामाजिक वास्तव अधोरेखित करणारी घटना समोर आली.

या शिबिरात गावातील अर्जुन सखाराम पिसाळ हे 70 वर्षांचे वृद्ध नागरिक, ज्यांच्याकडे आजतागायत ना आधार कार्ड होते, ना मतदान ओळखपत्र-अशी धक्कादायक बाब उघडकीस आली. आयुष्याची सात दशके उलटूनही एका नागरिकाची शासकीय यंत्रणेत कुठेही नोंद नसणे, ही बाब उपस्थित सर्वांसाठी अंतर्मुख करणारी ठरली.

मी या देशाचा नागरिक आहे, पण माझी कुठेच नोंद नाही हे शब्द सांगताना त्या वृद्धाच्या डोळ्यांत अश्रू होते. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटूनही मूलभूत ओळखीपासून वंचित राहावे लागणे, हे सुशासनासाठी मोठे आव्हान असल्याचे यावेळी जाणवले.

ही बाब शिबिरात समोर येताच, आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या सूचनेनुसार तात्काळ तहसीलदार दीपा जेधे, नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी व बीएलओ यांनी तत्काळ कार्यवाही सुरू केली. तसेच ग्रामविकास अधिकारी संजय महाजन यांनी सरपंच वैशाली हिवराळे यांच्याशी समन्वय साधून संबंधित वृद्ध नागरिकांना रहिवासी दाखला तातडीने उपलब्ध करून दिला.

या घटनेतून शासन केवळ कागदोपत्री व्यवस्था नसून, सामान्य माणसाच्या अडचणींवर तत्काळ उपाय करणारी संवेदनशील यंत्रणा असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व प्रक्रियेमुळे त्या वृद्ध नागरिकाला आयुष्यात प्रथमच अधिकृत ओळखीचा अधिकार मिळण्याचा मार्ग खुला झाला.

केवळ योजना जाहीर करणे नव्हे, तर त्या अंतिम घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमदार अमोलभाऊ जावळे यांचे सुशासनाचे ध्येय असल्याचे या घटनेतून ठळकपणे अधोरेखित झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !