जळगाव महानगरपालिका निवडणूक : उमेदवारी कापताच निष्ठावंतांना अश्रू अनावर ; भाजपाची डोकेदुखी वाढली

कामे आम्ही करायची व प्रचार त्यांचा करायचा ! : तिकीट कापताच इच्छूक संतप्त


Jalgaon Municipal Corporation Election : Loyal party workers break down in tears after their candidacies are rejected; BJP’s troubles increase जळगाव (30 डिसेंबर 2025) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात भाजपने उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या इच्छुक उमेदवार संगीता पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने आमदार सुरेश भोळे यांना घेराव व्यथा मांडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी पाटील कुटुंबाला रडू कोसळले तर प्रश्नांच्या सरबत्तीमुळे विद्यमान आमदार भोळे हतबल झाले.

भाजपाची डोकेदुखी वाढली
शहरातील हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये मंगळवार, 30 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता महायुतीची बैठक झाली. भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्यांना संधी नाकारण्यात आली, अशा कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष या ठिकाणी पहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये इच्छुक असलेल्या संगीता पाटील यांना उमेदवारी न दिल्यामुळे डावलल्याने त्यांच्या समर्थकांसह कुटुंबाने थेट आमदार सुरेश भोळे यांना गाठले आणि जाब विचारला. यावेळी संगीता पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.

पाटील कुटुंबाचा आक्रोश
‘आम्ही ज्याप्रमाणे तुमच्याशी हक्काने बोलत आहोत, त्याचप्रमाणे तुम्ही आमच्यासाठी वरिष्ठांशी का बोलत नाही? आमच्यासाठी त्यांच्याशी भांडण करा, पण आम्हाला न्याय द्या, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी पाटील कुटुंबातील सदस्यांना रडू कोसळल्याने परिसरातील वातावरण भावूक झाले होते. एकीकडे पाटील कुटुंबाचा आक्रोश आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांचा दबाव, अशा कात्रीत आमदार सुरेश भोळे अडकल्याचे दिसून आले. कुटुंबाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आमदार भोळे यांची चांगलीच दमछाक झाली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !