भुसावळ गोळीबाराने हादरले : सुदैवाने गोळी न लागल्याने टळली हानी

गुन्हेगारी ठेचण्याची गरज : 15 दिवसात दुसर्‍यांदा झाला गोळीबार


Bhusawal was shaken by a shooting incident; fortunately, no one was hit by a bullet, thus averting any casualties भुसावळ (31 डिसेंबर 2025) : शहरात लूटीच्या उद्देशाने आलेल्या चौघांनी 39 वर्षीय प्रौढावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच शहरात पुन्हा एकाला ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना जुना सातार्‍यात मंगळवारी रात्री 11.45 वाजता घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नसलेतरी शहरातील वाढती गुन्हेगारी समोर आली आहे. विविध घटनांमध्ये आतापर्यंत सराईत गुन्हेगार पुढे होते मात्र आता अल्पवयीनांच्या हाती शस्त्र आल्याने ही बाब निश्चितच समाजासाठी चिंताजनक आहे.

हॉटेलमधील वादातून गोळीबार : चौघांविरोधात गुन्हा
संदीप मनोहर कोळेकर (50, जुना सातारा, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवार, 30 रोजी शिवपूर कन्हाळा रोड भागातील एका हॉटेलवर धक्का लागल्याने संशयीतांसोबत वाद झाला व त्यानंतर फिर्यादी घरी आले मात्र मंगळवारी पुन्हा दुचाकीवरून चौघे संशयीत जुना सातारा भागात दाखल झाले व वाद करू लागले व एकाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली मात्र सुदैवाने ती न लागल्याने कोळेकर बचावले.

मारहाण करीत संशयीत पळाले
यावेळी झालेल्या झटापटीत मुकेश सुरेश भोई यांनी आरोपींच्या हाताला हात लावल्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली व संशयीत पसार झाले.

चार जणांविरोधात गुन्हा : दोघे अल्पवयीन
संदीप कोळेकर यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयीत बाबा घेंगट, कुंदन पठाडे तसेच दोन अल्पवयीनांविरोधात विविध कलमान्वये शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून अल्पवयीनांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

15 दिवसांपूर्वीच गोळीबारात एक जण झाला जखमी
भुसावळच्या जळगाव नाका परिसरातून खळवाडीकडे जाणार्‍या पुलाच्या बाजूला स्व.नारायण पाटील व्यापारी संकुल आहे. या संकुलाजवळ असलेल्या पान टपरीवर उल्हास पाटील (39, जुना सातारा, भुसावळ) हे बुधवार, 17 रोजी रात्री उभे असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी टपरीजवळ गोंधळ घालण्यास सुरुवात केली व रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उल्हास गणेश पाटील यांनी संशयीताना विरोध केल्यानंतर एकाने सोबत आणलेल्या कट्यातून एक गोळी झाडल्याने ती उल्हास पाटील यांच्या उजव्या खांद्याजवळ लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. गोळीबारानंतर या भागात मोठी घबराट पसरून पळापळ झाली तर संशयीत पल्सर व मोपेडवरून पसार झाले. प्रत्यक्षदर्शी तसेच सीसीटीव्ही फुटेज तसेच खबर्‍यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागातून तीन संशयीतांना शहर, बाजारपेठ व जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !