राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते : 3 रोजी स्वीकारणार पदभार


Sadanand Date appointed as the Director General of Police of the state : He will assume charge on the 3rd मुंबई (31 डिसेंबर 2025) : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली असून 3 रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.

नियुक्तीवर आज शिक्कामोर्तब
रश्मी शुक्ला यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण असेल ? याची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू होती. राज्याच्या गृह विभागाने त्यासाठी सात ज्येष्ठ आयपीएस अधिकार्‍यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते यांचे नाव यात प्रामुख्याने चर्चेत होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सातपैकी तीन नावांची निवड करून ती राज्य सरकारकडे पाठवली होती. त्यातून सदानंत दाते यांच्या नियुक्तीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले.

3 रोजी स्वीकारणार पदभार
एका अधिकृत निवेदनात महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) भारतीय पोलीस सेवा रश्मी शुक्ला यांचा ’महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक’ म्हणून कार्यकाळ 3 जानेवारीला 2026 रोजी संपत आहे. त्यानंतर सदानंद दाते पदभार स्वीकारतील.

दोन वर्षांचा असेल कार्यकाळ
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनेलमेंट समितीने शिफारस केलेल्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले सदानंद वसंत दाते, भारतीय पोलिस सेवा यांची ’महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक (एचओपीएफ)’ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निकाल आणि आदेशांनुसार, ‘पोलीस महासंचालक’ या पदावर नियुक्त झालेल्या भारतीय पोलीस सेवेच्या अधिकार्‍याचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. त्यानुसार, भारतीय पोलीस सेवेचे सदानंद वसंत दाते हे नियुक्तीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी ‘पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य’ या पदावर राहतील.

सदानंद दाते 1 एप्रिल 2024 पासून राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक (डीजी) होते. यापूर्वी त्यांनी सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी), महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख, मुंबईतील सह पोलिस आयुक्त (गुन्हे आणि कायदा आणि सुव्यवस्था) आणि मीरा-भाईंदर आणि वसई-विरार प्रदेशांचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !