जैनच्या तंत्रज्ञानामुळे गुजरात, राजस्थानच्या वाळवंटी भागात शेतीत क्रांती
जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकर्यांचा उत्तम प्रतिसाद
जळगाव (31 डिसेंबर 2025) : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या ‘संजीवन दिन’ जन्मदिनानिमित्त आयोजित ‘सायन्स-टेकवर्क’ कृषी महोत्सवाला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे 11 हजार शेतकर्यांनी या महोत्सवाला भेट देऊन जैन इरिगेशनच्या उच्च कृषितंत्रज्ञानाची अनुभूती घेतली. गुजरातमधील 100 हून अधिक डाळिंब उत्पादक शेतकर्यांनीही या महोत्सवात आपला सहभाग नोंदविला. कंपनीचे (गुजरात) सहकारी योगेश पटेल व अॅग्रोनॉमिस्ट चेतन गुळवे यांनी देखील शेतकर्यांशी संवाद साधला.
‘गुजरात आणि राजस्थानच्या वालुकामय प्रदेशात जिथे पूर्वी फक्त जिरे, इसबगोल व मोहरीचे उत्पादन घेतले जात असे, तेथे आज डाळिंबाचे भरघोस उत्पादन होत आहे. ही क्रांती जैन इरिगेशनच्या टिश्यू कल्चर व ठिबक सिंचनासारख्या उच्च कृषीतंत्रज्ञानामुळे शक्य होऊ शकली’ असे वरिष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी जैन हिल्स येथील बडी हंडा सभागृहात डाळिंब उत्पादक शेतकर्यांशी संवाद साधत या यशस्वी प्रयोगाबाबत सांगितले. 2004 मध्ये गुजरातच्या बनासकाठा जिल्ह्यातील डीसा येथे जैन इरिगेशनच्या टिश्युकल्चर डाळिंब लागवडीचा प्रथमच प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला मिळालेल्या यशामुळे सुरेंद्रनगर, हळवद, हिम्मतनगरसह अनेक भागात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड सुरू झाली. देशातील सर्वोत्तम गुणवत्तेच्या डाळिंबाचे अनेक पटींनी उत्पादन वाढले आहे. आज या भागातील डाळिंब निर्यातही होत आहे, शेतकर्यांचे उत्पन्न एकरी 30-40 हजार रुपयांवरून लाखो रुपयांचे डाळिंब येथे पिकतात त्यामुळे येथील भाग समृद्ध झालेला आहे. खरे तर महाराष्ट्रात डाळिंबाचे उत्पादन होत होते परंतु गुजरात व राजस्थानच्या शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने उत्पादनात त्यांनी आघाडी मिळविली आहे असेही डॉ. पाटील म्हणाले.

राजस्थानातील झालावार, बाडमेर व जालोर जिल्ह्यातही डाळिंब शेतीने आर्थिक विकासाला नवे आयाम दिले आहे. वालुकामय भागातील पाण्याचा पीएच व इसी जास्त असूनही जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानामुळे डाळिंबासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. या प्रयोगांमुळे गुजरात व राजस्थानच्या वाळवंटी भागात शेतीत मोठी क्रांती घडली असून, शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात जैन इरिगेशनचे योगदान अधोरेखित झाले आहे.
