भुसावळात कन्हाळे रोडवरील नाल्याचा भराव टाकून प्रवाह रोखला


In Bhusawal, the flow of the drain on Kanhale Road was blocked by filling it with debris भुसावळ (31 डिसेंबर 2025) : भुसावळ शहरातील चिकू मळा व परिसरात गेल्या अनेक दशकांपासून अव्याहत वाहणार्‍या नैसर्गिक नाल्यावर बेकायदेशीररीत्या माती टाकून तो बुजविण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या नजरेआड सुरू असलेला बेकायदेशीर प्रकार समोर आल्यानंतर आता कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण व भविष्यातील सुरक्षितता धोक्यात आली असून स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शिवपूर-कन्हाळा रोडलगत असलेल्या विनायका कॉलनी, समर्थ कॉलनी परिसरातून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारा हा नैसर्गिक नाला गेल्या अनेक वर्षांपासून आर.एम.एस. कॉलनी, तुकाराम नगर, अमृत कॉलनी, गोदावरी पार्क, साई पार्क, चिकू मळा आदी भागांचे पावसाचे व सांडपाणी वाहून नेण्याचे महत्त्वाचे काम करीत आहे. या नाल्यावर सुमारे 25 वर्षांपूर्वी बांधलेली मोरी (पूल) आजही अस्तित्वात आहे.



मात्र गट क्रमांक 72/2 मधील प्लॉट क्रमांक 55 च्या मालकांनी कोणालाही सुचित न करता 28 डिसेंबर 2025 रोजी रातोरात शेकडो डंपर माती व मुरूम टाकून नाल्याचा मोठा भाग बंद केल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक रहिवाशांनी उघडकीस आणला आहे. ही कारवाई पूर्णतः बेकायदेशीर असून गौण खनिज नियमांचे सरळ उल्लंघन असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या नाल्याच्या दोन्ही बाजूंनी शासनाने आपत्ती नियोजनाअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून संरक्षक भिंती बांधल्या आहेत. तरीही नालाच ले-आऊटमध्ये दाखवण्यात न आल्याने आणि तो बुजवण्याचा प्रयत्न केल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. परिणामी डास, रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांचे आरोग्य गंभीर संकटात सापडले आहे.

इतकेच नव्हे तर परिसरातील जिवंत विहिर बुजवण्यात आली असून उर्वरित जलस्रोत बंद करण्याचा मानस असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच मोठमोठ्या हिरव्या झाडांची कत्तल केल्यामुळे पर्यावरणीय संतुलनही धोक्यात आले आहे.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या पावसाळ्यात नाल्याचा प्रवाह पूर्णपणे अडवल्यास संपूर्ण परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती असून आपत्ती व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो.

या प्रकरणी संपूर्ण परिसरातील रहिवाशांनी 30 डिसेंबर रोजी तहसीलदार नीता लबडे भुसावळ यांच्याकडे तक्रार दाखल करून बेकायदेशीर काम तत्काळ थांबवणे, बंद केलेला नाला मूळ स्थितीत खुला करणे व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विषयाची गंभीरता लक्षात घेऊन तहसीलदारांनी नीता लबडे यांनी तातडीची मीटिंग घेऊन दिनांक 31 डिसेंबर रोजी स्पॉट सर्वे भुसावळ तलाठी मंगेश पारिषे व मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे यांच्या मार्फत करून घेतला व त्यांच्या निरीक्षणात असे आढळून आले की विविध नियमांची पायमल्ली करत तसेच प्रशासनाला अंधारात ठेवून नैसर्गिक प्रवाह बुजवण्याचे प्रकार झालेले आहेत व यावरून पुढील कारवाईसाठी त्यांनी काम सुरू केले आहे.

परिसरातील नागरिकांनी या विषयात पोलीस प्रशासन तसेच प्रांत अधिकारी व सीओ यांना निवेदन दिलेले आहे. या विषयात नागरिक तातडीने कृती व्हावी यासाठी आग्रही आहेत अन्यथा हजारोंच्या संख्येने नागरिक आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. एवढा सगळा प्रकार कानावर पडत असताना देखील प्लॉट मालकाने नैसर्गिक प्रवाह बुजवण्याचे काम 31 डिसेंबर रोजी चालू ठेवलेले आहे. परवानगी कुणाची? माती कुठून आली? आणि कोणाच्या आशीर्वादाने? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

संतप्त नागरिकांचा प्रश्न एकच आहे की नैसर्गिक नाले खासगी प्लॉटसाठी गाडले जात असतील, तर उद्या शहर कोण वाचवणार?










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !