भुसावळात गुन्हेगारीचे उदात्तीकरणाचे रील्स टाकणार्‍यांसह प्रोत्साहन देणार्‍यांवर दाखल होणार गुन्हा : नूतन पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले

बुलेटवरुन आवाज काढणार्‍या स्टंटबाज तरुणांवर पोलिसांची ‘थर्ड आय’ वॉच ; सोशल मिडीयावर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन


In Bhusawal, cases will be registered against those who post reels glorifying crime, as well as those who encourage such acts : New Deputy Superintendent of Police Kedar Barbole भुसावळ (3 जानेवारी 2026) : सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या हव्यासपोटी हातात शस्त्रे बाळगणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे आणि आक्षेपार्ह गाण्यांवर ‘रील्स’ बनवून दहशत निर्माण करणार्‍या तसेच या रील्सला प्रोत्साहन देणार्‍या तरुणांना आता भुसावळातील नूतन पोलिस उपअधीक्षकांनी कडक इशारा दिला आहे. केदार बारबोले यांनी अशा स्टंटबाजांचा बंदोबस्त करण्यासाठी शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष ‘सायबर मॉनिटरिंग पथक’ तैनात केले असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर आता थेट भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल होणार असून यासाठी दोन्ही पोलिस ठाण्यातील कर्मचारी नियुक्त केले आहे.

सोशल मिडीयावर पोलिसांची करडी नजर
गेल्या काही दिवसांपासून भुसावळ शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांकडून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर हिंसक कृत्ये, तलवारींचे प्रदर्शन आणि भाईगिरी दर्शवणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात होते. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत होते. ही बाब गांभीर्याने घेत डीवायएसपी केदार बारबोले यांनी शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यांमधील निवडक पोलिस कर्मचार्‍यांचे एक विशेष पथक स्थापन केले आहे.

असे असेल पथकाचे काम
हे पथक सोशल मीडियावरील स्थानिक हॅशटॅग आणि संशयास्पद अकाउंट्सवर 24 तास लक्ष ठेवणार आहे. रील्समध्ये कुठेही शस्त्र (तलवार, पिस्तूल, चाकू) किंवा घातक वस्तू दिसल्यास तपास करून तातडीने कारवाई केली जाईल.

गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्यास कारवाई
जेलमधून सुटल्यावर मिरवणूक काढणे किंवा गुन्हेगारांचे समर्थन करणार्‍या पोस्ट टाकल्यास थेट एफआयआर दाखल होणार आहे. या कारवाईअंतर्गत केवळ व्हिडिओ बनवणारेच नाही, तर ते ‘शेअर’ लाईक करणारे आणि चिथावणी देणारे यांच्यावरही भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये (उदा. शांतता भंग करणे, शस्त्रास्त्र कायदा) आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.

पोलिस प्रशासनाचा ‘अल्टिमेटम’
सोशल मीडिया हे संवादाचे माध्यम आहे, दहशतीचे नाही. भुसावळमधील काही तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणारे व्हिडिओ बनवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा तरुणांचा शोध घेण्यासाठी आम्ही विशेष पथक बनवले आहे. जर कोणी अशा प्रकारचे आक्षेपार्ह रील अपलोड केले तर त्या तरुणाला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात केली जाईल. पालकांनीही आपल्या मुलांच्या सोशल मीडिया हालचालींकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !