जळगाव जिल्ह्यातील 24 सराईत गुन्हेगार हद्दपार


24 notorious criminals from Jalgaon district have been externed जळगाव (3 जानेवारी 2026) :जळगावातील महानगरपालिका निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. महापालिका निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी जळगाव पोलीस प्रशासन आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने कठोर पावले उचलली आहेत. जळगाव शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल 24 सराईत गुन्हेगारांना निवडणूक कालावधीत शहरातून हद्दपार करण्याचे आदेश निघाल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

एमआयडीसी आणि शहर पोलिसांची संयुक्त कारवाई
जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने पाठवलेल्या प्रस्तावावर उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी ही कारवाई केली. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 18 आणि जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सहा अशा एकूण 24 गुन्हेगारांचा समावेश आहे. या सर्व इसमांना 4 जानेवारी 2026 च्या मध्यरात्रीपासून ते 17 जानेवारी 2026 च्या सकाळी 8 वाजेपर्यंत जळगाव शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

मतदानासाठी अटींसह परवानगी
लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी या हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना 15 जानेवारी 2026 रोजी मतदानादिवशी केवळ दोन तासांची सवलत देण्यात आली मात्र, मतदान प्रक्रिया पूर्ण होताच या इसमांना तत्काळ जळगाव शहराची हद्द सोडावी लागणार आहे.

प्रशासनाचा इशारा
निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची दडपशाही किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या निर्णयामुळे जळगाव शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !