पुणे महापालिकेत विविध पदांवर नोकरीच्या आमिषाने वरणगाव-भुसावळातील नऊ जणांना आठ लाखांचा गंडा


Nine people from Varangaon-Bhusawal were defrauded of eight lakh rupees under the pretext of providing jobs in the Pune Municipal Corporation भुसावळ (3 जानेवारी 2026) : पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात सुपरवायझर, ज्युनिअर क्लार्क आणि वार्डबॉय या पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून भुसावळसह वरणगाव, पिंप्रीसेकम, मन्यारखेडे, अंजनसोडे भागातील नऊ जणांना तब्बल सात लाख 79 हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पुण्यातील नेहा निनाद नाईक (पुणे) यांच्याविरोधात वरणगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
तक्रारदार अतुल शिवाजीराव शेटे (58, रा.अजयनगर, वरणगाव) हे वरणगाव सीनियर कॉलेजमध्ये प्रयोगशाळा परिचर आहेत. 8 ऑगस्ट 2023 ते 6 मार्च 2024 या कालावधीत पुण्यातील आरोपी नेहा निनाद नाईक हिने फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीच्या साक्षीदारांना पुणे महानगरपालिकेत रिक्त जागांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.

आरोपी महिलेने फिर्यादी अतुल शेटे यांच्यामार्फत त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य विभागात विविध पदांवर नोकरी देण्याचे आश्वासन देऊन वेळोवेळी चार लाख 80 हजार रुपये उकळले. याव्यतिरिक्त, इतर साक्षीदारांकडून (श्रद्धा शेटे, श्रद्धा जोशी, रेणुका महाजन व विजय घोसास) आरोपीने नोकरीच्या नावाखाली दोन लाख 99 हजार रुपये परस्पर घेतले व एकूण सात लाख 79 हजार रुपये घेऊनही कोणालाही नोकरी दिली नाही आणि घेतलेले पैसेही परत न करता पोबारा केला.

संशयीत महिलेविरोधात गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अतुल शेटे यांनी वरणगाव पोलिसात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नेहा निनाद नाईक (रा.पुणे) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मंगेश बेडकोळी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !