मध्य प्रदेशातील रायसागरला पाय घसरून कोसळलेल्या महिलेचा फैजपूर रुग्णालयात मृत्यू
A woman who slipped and fell at Raisagar in Madhya Pradesh died at Faizpur hospital यावल (4 जानेवारी 2026) : मध्यप्रदेशातील रायसागर येथील 28 वर्षीय महिला शेतातून लाकडाची ओझे घेऊन घरी परतत असताना पाय घसरल्याने ती डोंगरावरून कोसळून गंभीर जखमी झाली. तिच्यावर फैजपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी तिचा मृत्यू झाला. मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रेश्मा लालसिंग बारेला (28) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
पाय घसरून महिलेचा मृत्यू
मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यात रायसागर हे गाव आहे. या गावातील रहिवासी रेश्मा लालसिंग बारेला (28) ही विवाहिता शेतातून लाकडाचे ओझे घेऊन घरी परत येत असताना डोंगरावरून येताना तिचा पाय घसरला आणि ती जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झाली. तिला उपचाराकरिता फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे 20 दिवस तिच्यावर उपचार चालले व उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

यावल पोलिसात नोंद
याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहे. मयत महिलेच्या पश्चात तीन मुले, पती असा परिवार आहे.

