रश्मी शुक्ला यांच्याकडून सदानंद दाते यांनी स्वीकारली पोलीस महासंचालक पदाची सूत्रे


Sadanand Date took charge as the Director General of Police from Rashmi Shukla मुंबई (4 जानेवारी 2026) : राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या 37 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडून राज्यातील सर्वात ज्येष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. तत्पूर्वी सकाळी शुक्ला यांना नायगाव येथील परेड मैदानावर परंपरेनुसार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी मानवंदना दिली. आपल्या काळात राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, याचे श्रेय संपूर्ण पोलीस दलाला जाते, अशी प्रतिक्रिया शुक्ला यांनी व्यक्त केली.

दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात
शुक्ला यांचा पोलीस महासंचालकपदाचा दोन वर्षांचा कालावधी शनिवारी संपुष्टात आला. आता दाते यांनाही पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाल्यापासून दोन वर्षांचा कालावधी मिळणार असल्यामुळे ते डिसेंबर 2027 रोजी सेवानिवृत्त होतील. दाते याआधी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख होते. राज्यातील सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्यामुळे महायुती सरकारला त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करायची होती. त्यानुसार त्यांना राज्यात परत पाठविण्याची राज्य सरकारची विनंती केंद्र सरकारने मान्य केली. त्यानंतर दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला. पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलणे त्यांनी टाळले.

विविध पदावंर सांभाळल्या जवाबदार्‍या
1990 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले दाते यांनी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्त, मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त तसेच आर्थिक गुन्हे विभाग तसेच मध्य मुंबई प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक आदी विविध जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात कामा रुग्णालयात शिरलेल्या दोन दहशतवाद्यांशी त्यांनी दोन हात केले होते. या प्रतिकाराच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात ते जखमी झाले मात्र दाते यांच्यामुळे या दोन दहशवाद्यांच्या ठावठिकाणाची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळू शकली. या हल्ल्यानंतर दहशतवाद्याविरोधातील लढ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘फोर्स वन’च्या प्रमुखपदाची जबाबदारी दाते यांनी स्वत:हून स्वीकारली होती.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !