पुण्यात 32 कोटींचा प्रतिबंधीत हुक्का साठा जप्त
A stock of banned hookah worth 32 crore was seized in Pune पुणे (4 जानेवारी 2026) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. ली.’ या कंपनीवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल 31 कोटी 67 लाख 21 हजार 987 रुपये किंमतीचा हुक्का प्रतिबंधीत साठा जप्त केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही कारवाई 2 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली. यापूर्वी 1 डिसेंबर 2025 रोजी या कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार, या नमुन्यांमध्ये ‘निकोटिन’ पॉझिटिव्ह आढळले. हे उत्पादन मानवी आरोग्यास घातक असून महाराष्ट्र सरकारने 16 जुलै 2025 रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे असल्याचे स्पष्ट झाले. एकूण किंमत 31 कोटी 67 लाख,21,987 रुपये (31.67 कोटी)रुपयांचे विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा साठा जप्त करून कंपनीच्या दारांना सील ठोकले आहे.

यांच्याविरोधात गुन्हा
अनिल कुमार चौहान (असिस्टंट मॅनेजर), असिफ फाजलानी (संचालक), फैजल फाजलानी (संचालक), मे. सोएक्स इंडिया प्रा. ली. (कंपनी) या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित वस्तूंवर कारवाईसाठी कठोर आदेश दिल्यानंतर आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही याचा आढावा घेतला जात असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर प्रतिबंधित वस्तूंच्या उत्पादना विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

