भाजपाच्या भूमिकेवर विरोधकांचे प्रश्नचिन्ह : मालेगाव महापालिकेसाठी भाजपचे चार मुस्लिम उमेदवार : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
Opposition questions BJP’s stance : BJP fields four Muslim candidates for Malegaon Municipal Corporation; State President Ravindra Chavan’s first reaction मालेगाव (4 जानेवारी 2026) : मालेगावातील निवडणुकीत भाजपने चार मुस्लिम समाजाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतर आता विरोधकांनी डिवचण्यास सुरूवात केली आहे. यावरून भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रविवारी मालेगावच्या दौर्यावर असताना त्यांनी यावर सफाईदारपणे उत्तर दिले आहे.
भाजपा सर्व समाजाला घेवून चालणारा पक्ष
मुस्लिम समाजाच्या उमेदवारावर प्रश्न विचारला असता रवींद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सर्वच समाजात सकारात्मक मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकासामुळे सर्वजण सोबत येत आहेत. तसेच भाजप सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मालेगाव महापालिकेत देखील विविध जाती धर्मातून उमेदवारी मागण्यांसाठी अर्ज आले होते. त्यानुसार, ज्या-त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला संधी देता येईल, तशी संधी देण्याचे काम भाजपने केले असल्याचे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे.

रोड शो करीत मतदानाचे आवाहन
दरम्यान, मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल, ताशा तसेच संबळ व हलगी या पारंपरिक वाद्याच्या तालावर बैलगाडीवरून रोड शो करत मतदान करण्याचे जनतेला आवाहन केले.
सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे : मंत्री गिरीश महाजन
मंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक पदाधिकार्यांची चांगलीच कान उघाडणी केली. पक्षांतर्गत असलेल्या मतभेदांवर बोट ठेवत, पूर्वी सर्वांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला होती मात्र आता सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपाने मालेगावात 22 जागांवर आपले उमेदवार उभे केले असून, या सर्व जागा निवडून आणून मालेगाव महापालिकेवर भाजपचाच महापौर बसवण्याचे उद्दिष्ट महाजन यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवले.

