रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे रन मॅरेथॉन स्पर्धेचे भुसावळमध्ये रविवारी आयोजन


भुसावळ (5 जानेवारी 2026)  : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि मंत्री संजय सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने रेलसिटी रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळसाठी धावूया, आरोग्यासाठी धावूया या संकल्पनेतून शहरातील नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करण्याचा हा उपक्रम आहे. ही मॅरेथॉन रविवार, 11 जानेवारी रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी. एस. मैदान), येथून सुरू होणार आहे. या स्पर्धेत अनुभवी धावपटूंसह सर्वसामान्य नागरिक आणि कुटुंबीयांचा सहभाग अपेक्षित आहे.

तीन गटात होणार स्पर्धा
स्पर्धेत 10 किलोमीटर तंदुरुस्ती धाव, 5 किलोमीटर जनजागृती धाव तसेच तीन किलोमीटर आनंद धाव असे तीन प्रकार ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र अहवाल वेळ व प्रारंभ वेळ निश्चित करण्यात आली आहे. सहभागींसाठी नोंदणी सुरू आहे, स्पर्धेत सहभागी होणार्‍या धावपटूंना मॅरेथॉन प्रदर्शनामध्ये आकर्षक भेट पिशवी व टी-शर्ट, धावण्यादरम्यान मार्गदर्शन व पाणी व्यवस्था, तसेच स्पर्धेनंतर पदक, प्रमाणपत्र आणि पौष्टिक नाश्ता देण्यात येणार आहे. यासोबतच लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.




वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन
ऑनलाईन नोंदणीसाठी टाउनस्क्रिप्ट या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध असून ऑफलाईन नोंदणीसाठी शहरातील यावलकर कॉम्प्युटर्स, कल्पना रसवंती, अष्टभुजा डेअरी, प्रभाकर हॉल, बालाजी मंदिराजवळील अंबिका स्टोन, तार ऑफिस रोडवरील केअर प्लेस वॉटर सोल्युशन या केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. नोंदणीची संख्या मर्यादित असल्याने इच्छुक नागरिकांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख सुयश न्याती यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !