रील्सस्टारचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून मृत्यू


A Reels star died after being crushed under a tractor trolley मुंबई (5 जानेवारी 2026) : रील्सस्टार असलेल्या तरुणाचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या या भीषण अपघातात कुटुंबाचा कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड गेला. विशेष म्हणजे मयत गणेश डोंगरे हा सोशल मीडियावरील रीलस्टार होता आणि दुर्दैवाने त्याची पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच तिच्या डोळ्यादेखत हा अपघात घडला.

ऊस वाहतुकीदरम्यान दुर्घटना
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उसाच्या हंगामात येथील लाखो कुटुंबे उदरनिर्वाहासाठी राज्याच्या विविध भागांत तसेच परराज्यात ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील रहिवासी गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी हेही पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीसाठी बाहेर पडले होते. मेहनतीच्या घामातून आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून गणेश डोंगरे हे पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींसह ऊसतोडणीसाठी गेले होते. मात्र, ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली त्यांच्या अंगावरून गेल्याने गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अंगावरुन ट्रॅक्टरची ट्रॉली गेल्याने मृत्यू
लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आपल्या चिमुकल्या मुलींसह ऊसतोडणी करत होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन ते साखर कारखान्यावर माप होण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. याच वेळी जवळून जाणार्‍या दुसर्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक गणेश यांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात गणेश यांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक कामगार जखमी झाला. काही क्षणांतच अश्विनीच्या डोळ्यांसमोर होत्याचं नव्हतं झालं.

पत्नी फेसबुक लाईव्ह करतानाच आक्रित घडलं
या दुर्घटनेला आणखी वेदनादायक बनवणारी बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी अश्विनी फेसबुकवर लाईव्ह होती. लाईव्ह सुरू असतानाच ट्रॉली गणेश यांच्या अंगावर पडली. पतीचा मृत्यू पत्नीच्या डोळ्यादेखत घडताच तिच्यावर जणू आभाळ कोसळलं.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !