ओवेसींना देशाबाहेर हाकला ; एमआयएमची मान्यता रद्द करा : नवनीत राणा
अमरावती (5 जानेवारी 2025) : भाजप नेत्या नवनीत राणा आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यातील वादाने नवे वळण घेतले आहे. दोघा नेत्यांमधील शाब्दीक युद्ध वाढतच असून आता नवनीत राणा यांनी एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करीत ओवेसींना देशाबाहेर हाकलण्याची मागणी केली आहे.
काय घडले नेत्यांमध्ये ?
काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा संदर्भ देत हिंदूंना उद्देशून केलेले आवाहन मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. जर ते 19 मुलं जन्माला घालत असतील तर आपणही किमान चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि त्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या वक्तव्याने लोकसंख्या, धर्म आणि राजकारण यांचा संगम असलेला वाद पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला.

तुम्ही कितीही मुले जन्माला घाला, आम्हाला देणे-घेणे नाही
नवनीत राणांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अमरावतीतील जाहीर सभेत जोरदार पलटवार केला. त्यांनी उपरोधिक शैलीत नवनीत राणांना डिवचत, तुम्ही चार नाही, तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काहीही देणंघेणं नाही, असे म्हटले मात्र ओवैसी यांचा रोख केवळ विधानावर नव्हता, तर त्या मागील राजकीय हेतूंवर होता. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे देशातील लोकांचे लक्ष महागाई, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरून हटवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. द्वेषाचे राजकारण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.
राणा म्हणाल्या, ओवेसींची हकालपट्टी करा
ओवेसींच्या या टीकेनंतर आता नवनीत राणा यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी थेट असदुद्दीन ओवेसी यांच्या राष्ट्रनिष्ठेवर आणि घटनात्मक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डेमोक्रेसी बदलत चालली आहे, यावर ओवेसींनी बोलले पाहिजे. या देशात राहायचे असेल, तर संविधान मानावे लागते, असे म्हणत त्यांनी ओवैसींवर गंभीर आरोप केले. केवळ वक्तव्यापुरते न थांबता, त्यांनी ओवैसींचे नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवावे, अशी थेट मागणी करत वादाला अधिक धार दिली.
काय म्हणाल्या राणा ?
नवनीत राणा यांनी आपल्या वक्तव्यात ओवेसींवर अनेक मुद्यांवरून हल्ला चढवला. पाकिस्तानमध्ये जाऊन दहा नाही, तर वीस मुलं जन्माला घाला, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. ओवेसींच्या मनात काय विचार चालले आहेत, हे आम्हाला माहिती आहे, असा दावाही त्यांनी केला. तुम्ही संसद सदस्य आहात, डेमोक्रेसीवर बोला. पण तुम्ही संविधानाला मानत नाही, भारत माता की जय म्हणत नाही, वंदे मातरम बोलत नाही, असे म्हणत त्यांनी ओवैसींच्या देशप्रेमावरच प्रश्न उपस्थित केला मग तुम्ही या देशाला काय मानता? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

