भुसावळात नियम पाळणार्यांचा सन्मान ; विनाहेल्मेट चालकांना दणका
भुसावळ वाहतूक शाखेचा महामार्गावर अनोखा उपक्रम
In Bhusawal, those who follow the rules are being honored; drivers without helmets are being penalized भुसावळ (6 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील महामार्गावरून प्रवास करताना दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी शहर वाहतूक शाखेतर्फे रविवारी एक विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करत हेल्मेट परिधान करणार्या वाहनधारकांचे चक्क गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. नियमांकडे पाठ फिरवणार्यां वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले व त्यांच्या सहकार्यांनी महामार्गाजवळ नाकाबंदी लावली. यावेळी महामार्गावरून शहरात जाणार्या प्रत्येक दुचाकीस्वाराची तपासणी करण्यात आली. ज्या चालकांनी हेल्मेट घातले होते, त्यांचे पोलीस प्रशासनातर्फे कौतुक करण्यात आले. महाले यांनी स्वतः त्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.


हेल्मेट ओझे नव्हे तर सुरक्षा कवच
उमेश महाले यांनी सांगितले की, महामार्गावर होणार्या अपघातांमध्ये डोक्याला इजा झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाने हेल्मेटला ओझे न समजता ते डोक्यात ठेवावे. दरम्यान, या मोहिमेत ज्यांच्याकडे हेल्मेट नव्हते, अशा वाहनधारकांवर वाहतूक नियमांनुसार दंड आकारण्यात आला. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत.







