भुसावळ आरपीएफचा गुन्हेगारांना ‘ब्रेक’ : प्रवाशांचा 16 कोटींचा मुद्देमाल केला परत

रेल्वे सुरक्षा दलाची वर्षभरातील कामगिरी


Bhusawal RPF puts a ‘stop’ to criminals : Returned stolen goods worth 16 crore rupees to passengers भुसावळ (6 जानेवारी 2026) : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाने 2025 या वर्षात गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासोबतच ‘खाकी’तील माणुसकीचे दर्शन घडवले आहे. ‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत प्रवाशांचा चुकून विसरलेला तब्बल 16 कोटी 42 लाख 28 हजार 926 रुपयांचा मुद्देमाल शोधून तो प्रामाणिकपणे मूळ मालकांना परत केला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने केवळ गुन्हेगारांच्याच मुसक्या आवळल्या नाहीत, तर 16 प्रवाशांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढत जीवनदान दिले आहे.

सात महिलांना प्रसुतीसाठी मदत
रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांची सुरक्षित प्रसूती करणे असो किंवा चालत्या गाडीत प्रवाशांचे प्राण वाचवणे,आरपीएफच्या जवानांनी प्रत्येक वेळी तत्परता दाखवली.वर्षभरात 7 महिलांना ‘ऑपरेशन मातृशक्ती’ अंतर्गत सुरक्षित प्रसूतीसाठी मदत करण्यात आली तसेच विनाकारण साखळी ओढून रेल्वेचा खोळंबा करणार्‍या एक हजार 840 प्रवाशांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. बनावट तिकीट दलाल आणि चोरांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ तिकीट दलालांच्या विळख्यातून प्रवाशांना सोडवण्यासाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन उपलब्ध’ मध्ये 62 गुन्हे नोंदवून 74 दलालांना बेड्या ठोकल्या. प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारणार्‍या 376 सराईत गुन्हेगारांना पकडून आरपीएफने लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. नवीन भारतीय न्याय संहिता आणि रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार या सर्व गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



आरपीएफने असा केला माल परत
ऑपरेशन अमानतमध्ये प्रवाशांचा मौल्यवान 16 कोटी 42 लाखांचा ऐवज परत करण्यात आला. ऑपरेशन जीवन रक्षामध्ये रेल्वे अपघातापासून 16 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले. ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत प्रसूती दरम्यान सात महिलांना मदत केली. ऑपरेशन डिग्निटी मध्ये कुटुंबियांची ताटातूट झालेल्यांना 90 जणांना त्याच्या कुटुंबासोबत भेट घडवून दिली.गुन्हेगारी नियंत्रण आणि कारवाईत रेल्वे मालमत्ता चोरी प्रकरणी 58 गुन्हे नोंद केले आहे. यात 151 अटक करण्यात आले आहे. तिकीटांचा काळाबाजार 62 गुन्हे (ई-तिकीट दलाल) यात 74 जणांना अटक केली.

376 चोरटे जीआरपीकडे वर्ग
आरपीएफतर्फे गेल्या वर्षभरात सामानाच्या चोरीतील 376 संशयीतांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना लोहमार्ग पोलिसांकडे (जीआरपी) कडे सोपविण्यात आले आहे, चेन पुलिंग करणार्‍या 1 हजार 840 जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करणे ही आमची प्राथमिकता आहे. 2025 मध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून तिकीट दलाली आणि चोरीच्या घटनांना आळा घातला आहे. नवीन कायदे लागू झाल्याने गुन्हेगारांवर अधिक प्रभावीपणे कारवाई करणे शक्य झाले असल्याचे आरपीएफ वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी म्हणाले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !