प्रचारासाठी नेत पैसे न दिल्याने महिलांमध्ये दे दणादण : ‘या’ शहरातील घटनेची सर्वदूर चर्चा
नाशिक (7 जानेवारी 2026) : महापालिका निवडणुकांचा धूराळा उडाल्यानंतर आता प्रचाराने वेग घेतला आहे शिवाय प्रचारासाठी कार्यकर्ते नसल्याने रोजंदारीवर पैसे देवून महिला आणल्या जात आहेत मात्र नाशिकमध्ये अजब किस्सा घडला आहे. प्रचारासाठी गेलेल्या महिलांना पैसे न दिल्याने त्यांच्यात तुफान राडा होवून हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे.
असे आहे प्रकरण
नाशिकच्या सिडकोतील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या 65 महिलांना दुसर्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने जास्त हजेरी देण्याचे आश्वासन दिले. या महिलाही दोन पैसे अधिक मिळतील या अपेक्षेने आधीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून दुसर्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या मात्र दिवसभर त्यांना एकाच जागी बसून ठेवण्यात आले. दुपारनंतर जाण्यास सांगितले. कोणतीही रोजंदारीही त्यांना न मिळाल्याने त्यांच्यात आणि प्रतिनिधी महिलेत आधी झटापट नंतर मारामारीच झाली.

ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महिला दिवसभर ताटकळत बसून राहिल्या त्या उमेदवाराने चक्क सायंकाळी फोन बंद केला होता. यातील काही महिलांना अश्रू अनावर झाले तर काहींनी तीव्र संताप व्यक्त केला. हाताशी आलेले काम सोडून दुसर्या उमेदवाराच्या मागे गेलेल्या महिलांना मात्र यातून चांगला धडा मिळाला. अशीही चर्चा दिवसभर रंगली होती.
एका उमेदवाराचा प्रचाराला बोलविले असता दुसराच उमेदवार घेवून गेला मात्र तिथे हजेरी न मिळाल्याने त्या महिलांचे 30 हजारांचे नुकसान झाले. हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला मात्र महिलांनी संबंधितांविरेधात तक्रार न दिल्याने पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता.

