छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला

शिरसाट आणि सावेंनी पाळलेले गुंड म्हणत जलील यांचा पलटवार


Imtiaz Jaleel’s vehicle attacked in Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर (7 जानेवारी 2026) : एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नाराजांनी हल्ला केल्याची शक्यता
उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. जलील यांच्या वाहनावर संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही वेळातच मोठा जमाव जमा झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र वाहनाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

गुंडाला मंत्र्यांचे संरक्षण : जलील
या प्रकरणानंतर इम्तियाज जलील यांनी पोलिसांसमोर हा हल्ला झाला असून पोलिस काय कारवाई करतात? ते आता पाहणार असल्याचे म्हटले आहे. हल्ला करणार्‍या गुंडांना पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांचे सक्षण असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थितीचा आणि संबंधित व्यक्तींचा तपास सुरू आहे. पक्षांतर्गत उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद रस्त्यावर उमटल्याने, आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय परिणाम काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धावत्या वाहनातून बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न
प्रचार रॅलीदरम्यान बायजीपुरा-जिन्सी परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नाराज कार्यकर्त्यांच्या एका गटाने इम्तियाज जलील यांच्या धावत्या वाहनाचा पाठलाग करत त्यांना बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेपूर्वी काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला होता. परिस्थिती चिघळत चालल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !