भुसावळात फ्रंटसिट प्रवासी बसवणार्या रिक्षा चालकांविरोधात होणार कठोर कारवाई
Strict action will be taken against auto-rickshaw drivers in Bhusawal who allow passengers to sit in the front seat भुसावळ (8 जानेवारी 2026) : शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि अपघातांना निमंत्रण देणार्या अवैध प्रवासी वाहतुकीला चाप लावण्यासाठी भुसावळ शहर वाहतूक शाखा आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. फैजपूरकडे जाणार्या अॅपे रिक्षा चालकांकडून ड्रायव्हर सीटवर (फ्रंट सीट) प्रवाशांना बसवून जीवघेणा प्रवास केला जात असल्याच्या तक्रारींनंतर सोमवारी शहर वाहतूक शाखेने यावल नाक्यावर 28 अॅपे रिक्षांवर कारवाई केली. यामुळे नियमबाह्य वाहतूक करणार्या रिक्षा चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा
भुसावळ शहरातून फैजपूर आणि परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पे रिक्षांची वाहतूक चालते. अनेक रिक्षाचालक अधिक कमाईच्या हव्यासापोटी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतात. विशेषतः चालकाच्या दोन्ही बाजूंना (फन्टशिट) प्रवाशांना बसवले जाते. यामुळे चालकाला रिक्षा वळवताना किंवा ब्रेक लावताना अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावते. या पार्श्वभूमीवर,वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दुपारी यावल नाक्याजवळ थांबून पोलिसांनी फैजपूरकडे जाणार्या अनेक रिक्षांची तपासणी करण्यात आली. ज्या रिक्षांमध्ये पुढच्या सीटवर प्रवासी बसलेले आढळले, त्यांना पोलिसांनी तत्काळ खाली उतरवून संबंधीत रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई केली.

वारंवार गुन्हा घडल्यास परवाना होणार रद्द
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणार्या या चालकांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत प्रक्रियेनुसार दंडाची पावती फाडण्यात आली. तर काहींनी ऑनलाईन दंड पाठविण्यात आला. भविष्यात हे गुन्हे वारंवार घडल्यास परवाना रद्द करण्याबाबतची शिफारस देखील केली जाऊ शकते, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
जीव धोक्यात घालू नका
प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रिक्षा चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. फन्टशिटवर प्रवाशांना बसवल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होतात. ही मोहीम यापुढेही शहरात सातत्याने सुरू राहणार असून, रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले म्हणाले.

