‘लाडकी बहीण’ योजनेत फसवणूक : सहा महिला कर्मचार्यांवर कारवाई ; सर्व हप्ते केले वसूल
Fraud in the ‘Beloved Sister’ scheme : Action taken against six female employees; all installments recovered बुलढाणा (8 जानेवारी 2026) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा घेणार्यांवर आता प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलढाणा जिल्ह्यात चक्क सरकारी नोकरीत असतानाही या योजनेचा लाभ घेणार्या सहा महिला कर्मचार्यांकडून प्रशासनाने आतापर्यंत घेतलेली सर्व रक्कम वसूल केली असून त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई होणार असल्याची शक्यता आहे. या योजनेत चुकीची माहिती भरून लाभ घेणार्यांचे धाबे दणाणले आहे.
बुलढाण्यात झाली कारवाई
बुलढाणा जिल्ह्यात शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 196 महिला कर्मचार्यांनी या योजनेसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली होती. महिला व बालविकास विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यापैकी 190 कर्मचारी हे अर्धवेळ काम करणारे असून त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पात्र ठरवण्यात आले मात्र उर्वरित सहा महिला कर्मचारी या नियमित शासकीय सेवेत असून त्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे. तरीही त्यांनी शासनाची दिशाभूल करून योजनेचा लाभ घेतला.

कर्मचार्यांकडून 16 हजार 500 रुपयांची वसुली
सहा अपात्र महिला कर्मचार्यांनी योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत घेतलेला सर्व लाभ शासनाला परत करावा लागला आहे. प्रत्येकी 16 हजार 500 रुपये याप्रमाणे एकूण 99 हजारांची रुपयांची वसुली करण्यात आली. महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले यांनी या कारवाईची माहिती दिली आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा
या कर्मचार्यांकडून केवळ वसुली करून प्रशासन थांबलेले नाही, तर या कर्मचार्यांवर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शासनाची दिशाभूल करून लाभ लाटल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबन किंवा दंडात्मक कारवाई होण्याची दाट शक्यता असून, यामुळे या महिला कर्मचार्यांच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

