सत्ताधार्‍यांनी शंभर गुन्हे दाखल करावेत आम्ही मात्र जाब विचारणारच : भुसावळात गटनेता युवराज लोणारी

लोणारी उवाच : धमक्यांना भीक घालणार नाही ; नगराध्यक्षांनी स्क्रीप्टेड भाषण वाचले : नगराध्यक्षांचा बोलावता धनी दुसरा : सातवी पास शिकलेल्यांनी आम्हाला शिकवू नये राजकारण


गणेश वाघ
भुसावळ (8 नोव्हेंबर 2026) : भुसावळ पालिकेत नगराध्यक्षपदी महिला विराजमान झाल्याचा आम्हा भाजपेयींना निश्चितपणे आदर आहे मात्र विकासकामे थांबवल्याने आम्ही मुख्याधिकार्‍यांना जाब विचारला, त्यात नगराध्यक्षांचा कुठेही उल्लेख नसताना त्यांनी गुन्हे दाखल करण्याची केलेली भाषा ही दबावतंत्राची आहे शिवाय त्यांनी काल केलेली वक्तव्ये स्क्रीप्टेड आहेत त्यामुळे अशा धमक्यांना भाजपेयी कदापि घाबणार नाही व यापुढे शंभर गुन्हे दाखल झालेतरी आम्ही डगमगणार नाही व चुकीच्या कामांना आमचा विरोध असेल, असे स्पष्ट मत भुसावळातील भाजपा गटनेता युवराज लोणारी यांनी पत्रकार परिषदेत मांडले.

धमक्यांना भीक घालणार नाही
भुसावळातील मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादीने केलेल्या आरोपानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या आरोप व दाव्यांना युवराज लोणारींनी चपखलपणे उत्तरे देत त्यांच्यावर टीकेच्या फैरी झाल्या. लोणारी म्हणाले की, खरे तर नगराध्यक्षांनी गुन्हे दाखल करण्याची केलेली भाषा हास्यास्पद आहे मात्र शहरात चुकीचे काम झाल्यास भाजपा जाब विचारेल व शंभर गुन्हे दाखल झालेतरी आम्ही घाबरणार नाही, अशा धमक्यांनाही आम्ही भीक घालत नाही. नगराध्यक्षा काल जे बोलल्या त्यांना ते लिहून देण्यात आले होते व तेव्हढीच स्क्रीप्ट त्यांनी वाचून दाखवली.

जलकुंभाची जागा पालिकेने बदलली
संतोषी माता मंदिराजवळ जलकुंभाची नियोजित जागा पालिकेने बदलली आहे व पीएमसीच्या निर्णयान्वये हा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांपासून या जागेवर काम सुरू होते व मुख्याधिकार्‍यांच्या तोंडी आदेशाने काम बंद करण्यात आले. मुळातच अमृत योजनेला विलंब झाल्याचे आम्ही मान्य करतो मात्र भुसावळकरांना पाणी वेळेत मिळणे यावर आमचा भर असून पाण्यावर राजकारण करायला नको होते मात्र शहरविकासाच्या आड ते येत असतील तर त्यांना त्यांच्याच भाषेत आम्ही उत्तर देवू. खरे तर नगराध्यक्षांचा बोलावता धनी कोण आहे? हे शहरवासीयांना ठावूक असल्याचे ते कुणाचेही नाव न घेता म्हणाले.

हत्याकांडात भाजपाचे नुकसान : अदृश्य शक्ती सर्वांनाच ठावूक
भुसावळातील गुन्हेगारीवर काल भाष्य करण्यात आले मात्र आतापर्यंतच्या शहरातील हत्याकांडात भाजपा पदाधिकार्‍यांचे नुकसान झाले मात्र या हत्याकांडामागे कोण अदृश्य शक्ती होत्या? हे सुज्ञ भुसावळकरांना ठावूक आहे. जुने मुडदे आम्हाला उकरायला लावू नका, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

ग्रॅव्हीटी न कळणार्‍यांना योजना काय कळणार ?
शहरासाठी व्यापारी संकुल गरजेचे आहेत मात्र त्याआधी पाणी प्रश्न सोडवणे अपेक्षित असल्याने त्यास विरोध केला जाणे हे दुर्दैवी आहे. अमृत योजनेचा उद्भव यापूर्वी जेथे होता तेथे शेळगावचे पाणी रिटर्न येणार होते त्यामुळे बंधारा टिकला नसता त्यामुळे त्यांची जागा बदलण्यात आली व पाईप लाईनीचा खर्च वाढला तसेच अनेक भागात नव्याने पाईप लाईन मंजूर करून अंथरण्यात आली. सातवी पास लोकांना ग्रॅव्हीटी काय कळणार? त्यांनी मुळात योजनेवर बोलणेच हास्यास्पद असल्याचे लोणारी म्हणाले. संतोषी माता सभागृहाजवळील जागा बळकावण्याच्या आरोपावर लोणारी यांनी आरोप तथ्यहिन असल्याचे सांगत कोण व कशा पद्धत्तीने जागा बळकावत आहे ? हेदेखील त्यांनी सांगावे, असे ते म्हणाले.

‘अमृत’ची खुशाल क्वॉलिटी तपासा
लोणारी म्हणाले की, अमृतच्या जलकुंभाचे व पाईप-लाईन दर्जाची तपासणी करण्याची काल वल्गना झाली तर त्यांना आपण सांगू इच्छितो की, बिनधास्तपणे क्वॉलिटी तपासा, आमची त्याबाबत हरकत नाहीच मात्र तपासणी व बोलण्याचे अधिकार नगराध्यक्षांना आहेत, बाहेरच्या व्यक्तींना पालिकेत तोंड खुपसण्याचे कामच नाही. पालिकेतील चेकबुक, अकाउंटबुक कुणाच्यातरी घरी नेण्यात आल्याची बाब दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

अधिकार्‍यांना यापुढेही जाब विचारणार : किरण कोलते
भाजपा दक्षिण विभागाचे शहराध्यक्ष किरण कोलते म्हणाले की, यापुढेही भाजपाचे नगरसेवक मुख्याधिकार्‍यांना निश्चितपणे जाब विचारतील. शहर विकासाला आमचे सहकार्यच असेल मात्र चुकीचे काम झाल्यास निश्चितपणे आम्ही आवाज उचलू. आम्ही जाब विचारताना नगराध्यक्षांचा उल्लेख कुठेही केलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

घेराव घालणे म्हणजे दबाव टाकणे नव्हे : परीक्षीत बर्‍हाटे
अमृत जलकुंभाचे काम बंद करण्यात आल्याने भाजपा नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला व हा प्रकार म्हणजे दबाव नव्हे, असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व उपगटनेता परीक्षीत बर्‍हाटे म्हणाले. मूळात पालिकेच्या एनओसीनंतरच जलकुंभाचे काम सुरू करण्यात आले व अचानक काम बंद करण्यात आल्याचा प्रकार हा शहरवासीयांना वेठीस धरण्याचा आहे. चांगल्या विकासकामांना आमचा निश्चित पाठिंबा असेल, असे बर्‍हाटे म्हणाले.

प्रभागासाठी 50 लाखांचा निधी
नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी मंत्री सावकारे यांनी प्रभाग क्रमांक 22 मधील अल्पसंख्यांक भागासाठी 50 लाखांचा निधी दिल्याचे सांगितले. मंत्री सावकारे यांचे शहरावर प्रेम असून त्यांच्या नेतृत्वात शहरात विकासकामांची घौडदौड यापुढेही असेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक राजेंद्र आवटे व नगरसेवक गिरीश महाजन यांनीही सत्ताधार्‍यांवर टीकेची झोड उठवली.

यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती
यावेळी गटनेता युवराज लोणारी, उपगटनेता परीक्षीत बर्‍हाटे, किरण कोलते, पिंटू कोठारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, महेंद्रसिंग ठाकूर निक्की बत्रा, विशाल नाटकर, सुजित भोळे, संदीप सुरवाडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, बापू महाजन, देवा वाणी, कैलास चौधरी, प्रशांत नरवाडे, बाळा सोनवणे, रुपेश देशमुख, अल्बर्ट तायडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !