भुसावळात महिलांसाठी वातानुकूलित शौचालयांची होणार उभारणी : नगराध्यक्षा गायत्री भंगाळे
दुरवस्था झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज संकुलाची पाहणी : तत्काळ दुरुस्तीचे आदेश
Air-conditioned toilets for women will be constructed in Bhusawal : Mayor Gayatri Bhangale भुसावळ (9 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाची झालेली दुरवस्था पाहता शुक्रवारी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पदाधिकार्यांसह पाहणी केली. यावेळी महिलांसाठी शौचालय असतानाही त्याला कुलूप ठोकण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त करीत तातडीने कुलूप उघडण्याचे निर्देश दिले तसेच शौचालयाची दुरवस्था पाहून तातडीने पालिका प्रशासनाला दखल घेण्याचे निर्देश दिले. महिलांसाठी शहरात आता वातानुकूलित शौचालय उभारणी करण्याचा त्यांनी निर्णय घेत या संदर्भात पालिका प्रशासनाला निर्देश दिले. महिलाच महिलांच्या समस्येबाबत इतक्या संवेदनशीलपणे जाणू शकत असल्याने व जागीच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शौचालयाची दुरवस्था पाहून संताप
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर केवळ कार्यालयात बसून न राहता थेट ग्राऊंड झीरोवर उतरून समस्या समजून घेण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने त्यांनी भाजपचे गटनेते युवराज लोणारी तसेच अन्य सहकारी नगरसेवकांसह शहरातील महिला शौचालयाच्या दुर्दशेची ‘ग्राऊंड रिलिटी’ जाणून घेतली. यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील बंद अवस्थेत असलेल्या महिला शौचालयाचे कुलूप उघडण्यास सांगून यातील दुर्दशेची पाहणी केली.

शहरात आता वातानुकूलित शौचालय
या परिसरात महिलांसाठी एकही शौचालय वा प्रसाधनगृह नसल्याने भगिनी वर्गाची मोठी कुचंबणा होत असल्याचे जाणून त्यांनी तात्काळ एक मोठा निर्णय घेतला. यात त्यांनी नगरपालिका प्रशासनानाला शहरात वातानुकुलीत अर्थात एसी शौचालये उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. हे काम लवकरच मार्गी लागणार आहे. पाहणी प्रसंगी समन्वयक प्रा.उत्तम सुरवाडे, प्रतोद उल्हास पगारे, उपगटनेते सोहेल खान पठाण, नगरसेवक सचिन अण्णा पाटील, अकील पिंजारी आणि अन्य नगरसेवक देखील उपस्थित होते. यावेळी अमृत योजनेतून सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाचीदेखील त्यांनी पाहणी करीत सूचना केल्या.
नगराध्यक्षा म्हणाल्या : बोलण्याऐवजी कृतीतून दिसणार काम
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे म्हणाल्या की, शहरात काय-काय करणार हे आपण बोलण्याऐवजी कृतीतून दाखवणार आहोत. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची आपण निश्चितपणे पूर्ती करू मात्र महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेता शहरात आता वातानुकूलित शौचालयांची उभारणी करू, असेही त्या म्हणाल्या. केवळ कॅबिनमध्ये बसून समस्या सुटत नसून यासाठी थेट त्या जाणून घेण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. निव्वळ बोलण्यापेक्षा कृती करून भुसावळकरांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

