जळगावात भाजपाची पुन्हा कारवाई : पक्षशिस्त मोडणार्या तीन पदाधिकार्यांची हकालपट्टी
BJP takes further action in Jalgaon : Three office-bearers expelled for violating party discipline जळगाव (12 जानेवारी 2026) : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगावमध्ये भाजपने पुन्हा एकदा पक्षशिस्त आणि धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यात जळगाव जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय सोनवणे यांचाही समावेश आहे.
पक्षाच्या प्रतिमेला निर्माण झाली बाधा
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये आणि संघटनात्मक शिस्त कायम राहावी, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित पदाधिकार्यांच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपच्या अधिकृत धोरणांना हरताळ फासणे आणि पक्षविरोधी कारवाया करणे, यामुळे पक्षाच्या प्रतिमेला बाधा निर्माण होत असल्याचे निष्पन्न झाले.

याचाच परिणाम म्हणून, भाजपच्या कोअर कमिटीने संबंधित पदाधिकार्यांचे प्राथमिक सदस्यत्व आणि त्यांच्याकडे असलेली सर्व पदे रद्द करत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये अक्षय चत्रभुज सोनवणे (जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष), किशोर (श्रीकृष्ण) गोविंदा वाघ: (प्रभाग 19 ‘ड’ मधून अपक्ष उमेदवारी केल्याने कारवाई), देवयानी सुभाष चौधरी: (प्रभाग 13 ‘ब’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असल्याने कारवाई) यांचा समावेश आहे.
याआधी भाजपने तब्बल 27 जणांची पक्षातून हकालपट्टी केली होती. यानंतर तीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जळगाव भाजपच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

