दोन लाखांचे लाच प्रकरण भोवले : थाळनेर प्रभारी शत्रूघ्न पाटील यांच्यासह चौघा लाचखोर कर्मचार्यांचे निलंबन : हेमंत पाटील नूतन प्रभारी
गणेश वाघ
Two lakh rupee bribery case proves costly : Four corrupt employees, including Thalner in-charge Shatrughna Patil, suspended ; Hemant Patil appointed as the new in-charge धुळे (12 जानेवारी 2026) : अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तीन लाखांची लाच मागून तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्वीकारताना थाळनेर पोलिस ठाण्यातील हवालदाराला धुळे एसीबीने अटक केली होती तर या प्रकरणात अन्य तीन कर्मचार्यांचा सहभाग आढळल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची कारवाई सोमवारी धुळे एसीबीने केल्यानंतर पोलिस वर्तुळात खळबळ उडाली होती.
धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी लाच प्रकरणात पोलिसावर कारवाई होताच तातडीने कठोर पावले उचलत थाळनेरचे प्रभारी अधिकारी शत्रूघ्न पाटील यांना कर्मचार्यांवर नियंत्रण न ठेवल्याने तातडीने निलंबित केले असून त्यासोबत लाच मागितल्याचा आरोप असलेल्या चौघा कर्मचार्यांनाही तडकाफडकी निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, थाळनेर प्रभारी अधिकारीपदी शिरपूरचे हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षकांनी दिला कठोर कारवाईचा संदेश
शिस्तीचे खाते म्हणून ओळख असलेल्या पोलिस दलातील एकाचवेळी चार कर्मचार्यांवर लाच प्रकरणात कारवाई झाल्याने पोलिस दलावर टीकेची झोड उठली होती मात्र ‘कायद्यापुढे सर्व समान’ या उक्तीने कार्य करणार्या धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी तडकाफडकी थाळनेर प्रभारी सहाय्यक निरीक्षक शत्रूघ्न पाटील यांच्यावर स्लॅक सुपरव्हीजन व कर्मचार्यांवर नियंत्रण न ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांना सोमवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले शिवाय चार लाचखोर कर्मचार्यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
थाळनेरातील कारवाईने पोलिस दलात खळबळ
लाच प्रकरणातील तक्रारदार मौजे महादेव दोंदवाडा, नागेश्वरपाडा, ता.शिरपूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांविरोधात 18 ऑक्टोबर 2023 रोजी थाळनेर पोलिसात अंमल पदार्थविरोधी कलमान्वये गुन्हा (गुरनं.157/2023) दाखल आहे. थाळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार भूषण रामोळे, कॉन्स्टेबल धनराज मालचे, किरण सोनवणे, मुकेश पावरा आदींनी तक्रारदाराच्या वडिलांना अटक करायची नसल्यास तीन लाख रुपये लागतील, असे सांगितल्यानंतर दोन लाखांची तडजोड झाली मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने सोमवारी धुळे एसीबीकडे या संदर्भात दूरध्वनीद्वारे तक्रार नोंदवल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला. शिरपूर शहर पोलिस ठाणे हद्दीतील करवंद नाक्यावर कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा (33, शिवप्रसाद नगर, शिरपूर, जि.धुळे) याने लाच स्वीकारली तर अन्य तीन संशयीत पथक येताच पसार झाल्याने चौघांविरोधात शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नियंत्रण नसल्याने अधिकार्याचेही निलंबन
लाच प्रकरणात तब्बल चार कर्मचार्यांचा सहभाग आढळल्याने पोलिस दलावर टीकेची झोड उठली तर थाळनेर प्रभारी शत्रूघ्न पाटील यांचे पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांवर नियंत्रण नसल्याने व आढावा बैठकीत सूचना देवूनही लाच प्रकरणात कर्मचार्यांचा सहभाग आढळल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शत्रूघ्न पाटील यांना 12 जानेवारीपासून शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. पाटील यांची मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली असून निलंबन काळात गृह उपअधीक्षकांकडे दररोज उपस्थिती द्यावी तसेच दर शुक्रवारी परेडच्या दिवशी उपस्थित रहावे, असे निलंबन आदेशात पोलिस अधीक्षकांनी नमूद केले आहे.

