आचारसंहितेतून वाट मोकळी : लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा
The path is cleared by the code of conduct : Rs. 1500 deposited into the accounts of beloved sisters मुंबई (13 जानेवारी 2026) : संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर 1500 रुपयांचा हफ्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक मेसेज येऊ लागल्याने या योजनेचा लाभ प्रत्यक्षात सुरू झाल्याचे चित्र आहे.
लाडक्या बहिणींना दिलासा
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात कोणत्याही नव्या योजना, नवीन लाभार्थी किंवा मतदारांना आकर्षित करणार्या घोषणा करण्यास मनाई असते. याच कारणामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला मात्र आधीपासून सुरू असलेल्या आणि नियमित स्वरूपातील लाभ देण्यास आयोगाने परवानगी दिली त्यामुळे डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हफ्ता मंगळवारपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, मकर संक्रांतीच्या निमित्ताने 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होणार, अशा आशयाच्या बातम्या आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या दाव्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी दाखल झाल्या. काही राजकीय पक्ष आणि नागरिकांनी हा प्रकार आचारसंहितेचा भंग ठरतो का? असा सवाल उपस्थित केला. याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने थेट मुख्य सचिवांकडे याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.
मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात महत्त्वाची बाब स्पष्ट करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेल्या विकासकामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे मात्र त्या योजनांचा लाभ अग्रिम स्वरूपात देणे, नवीन लाभार्थी निवडणे किंवा लाभाच्या रकमेबाबत बदल करणे हे आचारसंहितेच्या विरोधात ठरते. हीच भूमिका निवडणूक आयोगाने ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत घेतली.

