भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांची डीआरएम पुनीत अग्रवालांनी केली पाहणी
स्वच्छता, कॅटरिंग व कोच सॅनिटेशनबाबत कडक सूचना
DRM Puneet Agrawal inspected the passenger facilities at Bhusawal railway station भुसावळ (14 जानेवारी 2026) : मध्य रेल्वेचे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाची सविस्तर पाहणी करत प्रवासी सुविधा, स्वच्छता व्यवस्था व कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन यांच्यासह वरिष्ठ शाखा अधिकारी उपस्थित होते.
प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्धीचे प्रयत्न
रेल्वे स्थानकाच्या पाहणीदरम्यान डीआरएम अग्रवाल यांनी स्थानक परिसरातील स्वच्छता, प्रवाशांसाठी असलेल्या सोयी-सुविधा, प्रतीक्षागृह, शौचालये तसेच तिकीट व अन्य कार्यालयीन कामकाजाची तपासणी केली. प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा मिळावी यासाठी सेवा गुणवत्तेत सुधारणा, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण राखणे तसेच कामकाज अधिक कार्यक्षम करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. भुसावळ स्थानकावरील कॅटरिंग स्टॉल्सचीही तपासणी करून अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांची पाहणी करण्यात आली. प्रवाशांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी विविध स्टॉलला भेट देत रेल्वे नियमांनुसार विक्री होत आहे का नाही, याची खात्री केली. जर वाजवी दरात कोणी विक्रेता विक्री करीत असेल तर थेट रेल्वे प्रशासनाला माहिती दिल्यास त्या विक्रेत्याविरूध्द कारवाई केली जाणार आहे, असे डीआरएम अग्रवाल यांनी सांगितले. प्रत्येक विभागाच्या अधिकार्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामाची पहाणी केली.

धावत्या गाडीत तपासणी
रेल्वे स्थानकावर आलेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडीची सुध्दा तपासणी करण्यात आली. कोच स्वच्छता, सॅनिटेशन व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यांचा आढावा घेण्यात आला. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी प्रवास वातावरण मिळावे, यासाठी संबंधित यंत्रणांना कडक निर्देश देण्यात आले. या तपासणीदरम्यान स्थानक व्यवस्थापक, मुख्य वाणिज्य निरीक्षक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छतेत तडजोड नाही
रेल्वे स्थानके आणि धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छतेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी त्याच्या कार्यक्षेत्रातील कामांना प्राधान्य द्यावे, स्वच्छतेवर अधीक भर पाहीजे. स्वच्छतेबाबत कुठलीही तडजोड स्विकारली जाणार नाही, असा सक्त इशारा डीआरएम अग्रवाल यांनी दिला. यावेळी विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

