जळगावात नाकाबंदीत 29 लाखांच्या रोकडसह लाखोंचे सोने-चांदी जप्त


In Jalgaon, cash worth 29 lakhs and gold and silver worth lakhs of rupees were seized during a roadblock जळगाव (15 जानेवारी 2026) : जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्व्हेक्षण पथके तैनात असतानाच बुधवार, 14 रोजी स्थिर पथकाने एका कारमधून 29 लाखांची रोकड तसेच 80 ग्रॅम सोने आणि 3 किलो चांदी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. बर्‍हाणपूरहून जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत हा मुद्देमाल आणला जात असल्याचे कारमधील तिघांनी सांगितले असले, तरी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या अधिकृत पावत्या नसल्याने हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारमधून लाखोंची रोकड जप्त
जळगावातील भरारी पथकाने नियमित तपासणीदरम्यान एका संशयास्पद कारला थांबवून झडती घेतल्यानंतर त्यात सुमारे 29 लाखांची रोकड व सोन्या-चांदीचा मुद्देमाल आढळला. कारमधील तिघांनी हा मुद्देमाल बर्‍हाणपूर येथून जळगावातील सराफा व्यावसायिकांकडे पोहोचविण्यात येत असल्याचे सांगितले मात्र या व्यवहारासंदर्भातील कोणत्याही पावत्या, बिल किंवा अधिकृत कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.

सुवर्ण खरेदीसाठी आल्याची माहिती
कारमध्ये बर्‍हाणपूर येथील राकेश दामोदरदास श्रॉफ, जयेश राकेश श्रॉफ आणि चालक नवीन भावसार हे तिघेच होते. स्थिर निरीक्षण पथकाने कार थांबवल्यानंतर आतील मुद्देमालाविषयी विचारणा केल्यानंतर बर्‍हाणपूर येथून जळगावमध्ये सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी व नवीन दागिने खरेदी करण्यासाठी रोख रक्कम आणि सोने-चांदी घेऊन जात असल्याचे तिघांनी सांगितले. सर्व मुद्देमाल बर्‍हाणपूर येथील एका सुवर्ण पेढीचे मालक दामोदारदास गोपालदास श्रॉफ यांच्या मालकीचा असल्याची माहिती आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !