छत्रपती संभाजीनगरात मतमोजणीस्थळी पोलिसांचा लाठीचार्ज : शिंदे गटाचे माजी महापौर विकास जैन जखमी

संजय शिरसाट म्हणाले ; मारहाण करणार्‍या पोलिसांची मस्ती उतरवणार


Police lathi-charge at the counting center in Chhatrapati Sambhajinagar : Former mayor Vikas Jain of the Shinde faction injured छत्रपती संभाजीनगर (16 जानेवारी 2026) : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येवू लागले असून छत्रपती संभाजीनगर येथील मतमोजणी केंद्रावरून मात्र धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये सत्ताधारी शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन जखमी झालेत असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत शिवाय पोलिसांची मस्ती उतरवणार असल्याचे म्हटले आहे.

काय घडले संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगरमध्येही चार ठिकाणी मतमोजणी सुरू असून उस्मानपुरा येथील शासकीय अभियांत्रिकी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी तुफान लाठीमार केला. त्यात शिंदे गटाचे नेते तथा शहराचे माजी महापौर विकास जैन जबर जखमी झाले.

या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात पोलिस कर्मचारी नागरिकांना घेरून काठ्यांनी मारहाण करताना दिसून येतो. एक व्यक्ती पोलिसांच्या मारापासून वाचण्यासाठी झाडाजवळ बसला असताना पोलिस त्याच्यावरही काठ्यांचा प्रहार करताना दिसून येत आहेत. केवळ आत जाण्याच्या विनंतीवरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिसांना सेन्स आहे की नाही ?
संजय शिरसाट म्हणाले, आज मतमोजणी आहे. मतदान नाही. या लोकांना कळत कसे नाही. त्यांना काही सेन्स नाही का? जखमी झालेले कार्यकर्ते आमचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडे ओळखपत्र आहे. त्यांना जनावरासारखे मारले. यांना कसली मस्ती आहे. एक अधिकारी इथे दिसत नाही. यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. या पद्धतीने मारहाण होत असेल तर हा पोलिसांचा मस्तवालपणा आहे. ही मस्ती कुठे तरी उतरली पाहिजे. हे माजी महापौर आहेत. त्यांचा हात मोडला. ते मतदान करायला जात होते का? हा मतमोजणीचा टाईम आहे ना.

ही कोणती मस्ती तुमची ?
ते पुढे म्हणाले, मतमोजणीसाठी सगळीकडे बॅरिकेड्स लावण्यात आलेत. सामान्य माणसांना प्रवेश नाही. असे असताना जे प्रतिनिधी आहेत, ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे, त्यांना आत जाण्यास तुम्ही मज्जाव का करता? ही कोणती मस्ती आहे तुमची? मतदान सुरू असते तर समजू शकतो आपण पण हा बळाचा वापर हा मस्तवालपणा आहे. पत्रकारांनाही मारहाण झाली. हा सागर देशमुख नामक जो कोणता प्राणी आहे ना, त्याची मस्ती उतरली पाहिजे. त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी सीपींशी बोललो. सीपी तिकडून बोलतात की, माझे अधिकारी तिकडे आहेत. त्यांना स्पॉटवर यायला काय झाले? नेमकी परिस्थिती काय आहे हे ते इथे येऊन पाहू शकत नाहीत का? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !