वरणगाव उपनगराध्यक्षपदी अरुणा इंगळे बिनविरोध
स्वीकृत नगरसेवकपदी शामल झांबरे व राजेंद्र चौधरी
Aruna Ingle was elected unopposed as the Deputy Chairperson of Varangaon वरणगाव (16 जानेवारी 2026) : वरणगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अरुणा इंगळे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली तसेच स्वीकृत नगरसेवकपदी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत उमेदवार शामल झांबरे व राजेंद्र चौधरी यांची निवड झाल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र आहे.
पाच वर्षात पाच उपनगराध्यक्ष होणार
नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवार, 15 रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष सुनील खाडे होते. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अरुणा इंगळे तर शिवसेना गटाकडून अशपाक शहा यांनी नामांकन दाखल केले मात्र अशपाक शहा यांनी आपले नामांकन माघारी घेतल्याने भाजपकडून अरुणा इंगळे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. नगरपालिकेत उपनगराध्यक्षपद दरवर्षी बदलणार असून पाच वर्षात पाच नगरसेवकांना संधी मिळणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची संख्या दोन असल्याने भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार शामल झांबरे यांची एकमताने निवड करण्यात आली तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र चौधरी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर दोन्ही गटांकडून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

स्वतंत्र कॅबिनची मागणी
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. अद्यापही नगराध्यक्ष सुनील काळे व भाजप नगरसेवकांमध्ये मनोमिलन झाले नसल्याचे चित्र आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष सहसा एकाच केबिनमध्ये बसतात ; मात्र सध्याच्या तणावामुळे ते शक्य नसल्याने भाजप गटातील नगरसेवकांनी स्वतंत्र कॅबिनची मागणी केली होती त्यामुळे उपनगराध्यक्षांना स्वतंत्र कॅबीन मिळण्याची शक्यता आहे.
खरा संघर्ष सुरू होणार?
सर्व नगरसेवकांनी विकासकामांसाठी सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली असली तरी अपक्ष नगराध्यक्षांना 21 नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणे आव्हानात्मक ठरणार आहे त्यामुळे येणार्या काळात संघर्ष वाढतो की सर्वांमध्ये समन्वय साधला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
20 जानेवारीला सभापती निवड
उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड पूर्ण झाल्यानंतर आता विविध समित्यांच्या सभापतींची निवड 20 जानेवारी रोजी होणार आहे. या निवडीसाठी सर्वच राजकीय गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे. कोणाच्या गळ्यात ही पदे पडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

