यावल उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सईदाबी मो.याकुब : भाजपा उमेदवाराचा चार मतांनी पराभव
तिरंगी लढतीत 12 मते घेत झाल्या विजयी : अतुल पाटलांची स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत इंन्ट्री
Congress’s Saidabi Mo. Yakub elected as the Deputy Chairperson of Yaval Municipal Council ; the BJP candidate was defeated by four votes यावल (16 जानेवारी 2026) : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड गुरूवारी पार पडली. यात भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेस अशी तिरंगी लढत येथे बघायला मिळाली. यात काँग्रेसच्या सईदाबी मोहंमद याकुब यांनी महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांच्या मदतीने 12 मते मिळवत भाजपाच्या उमेदवाराचा चार मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला एका अपक्षासह चार मते मिळाली तसेच स्विकृत सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी पालिकेत एन्ट्री केली. भाजपाकडून उमेश फेगडेदेखील स्वीकृत म्हणुन सभागृहात दाखल झाले.
सईदाबी मो.याकुब उपनगराध्यक्षपदी
यावल नगर परिषदेत गुरुवारी उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपकडून रुबाब मंहम्मद तडवी, राष्ट्रवादी अजित पवार गटच्या अंजुम बी.कदीर खान तर काँग्रेसच्या सहिदाबी मोहम्मद याकूब यांनी अर्ज दाखल केले. अर्ज छाननीनंतर सभागृहात हात उंच करून मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यात कॉँग्रेसच्या सईदाबी मो.याकुब यांना काँग्रेसचे सहा, महाविकास आघाडीच्या मित्र पक्ष उबाठाचे नगराध्यक्षांसह तीन व एक अपक्ष अशी 12 मते मिळाली. भाजपाला आपल्याकडे एक ही अपक्ष वळवता आला नाही. त्यांना त्यांच्या गटातील 8 मते मिळाली व त्यांचा 4 मतांनी पराभव झाला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला पक्षाचे तीन व एक अपक्ष अशी चार मते मिळाली होती.

नूतन पदाधिकार्यांचा सत्कार
उपनगराध्यक्ष निवडणुकीत उपनगराध्यक्ष म्हणून सईदा बी.यांची निवड जाहिर होताच जल्लोष करण्यात आला. निवडीप्रसंगी मुख्याधिकारी निशिकांत गवई, सहायक मुख्याधिकारी रविकांत डांगे, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, कक्ष अधीक्षक विशाल काळे, संग्राम शेळके सह नगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष छाया पाटील यांनी व नगर परिषद प्रशासनाकडून उपनगराक्षांचा सत्कार केला. उपनगराध्यक्ष सईदा बी.या काँग्रेसच्या शहराध्यक्ष शेख हकीम मोहम्मद याकुब यांच्या आई आहेत.
अतुल पाटील यांची स्विकृत म्हणून एन्ट्री
भाजपाकडून नगरपालिकेचे माजी गटनेता उमेश फेगडे तर काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची देखील स्विकृत नगरसेवक म्हणून निवड जाहिर झाली.

धनंजय चौधरीकडून सत्कार
काँग्रेस पक्षाचे यावल शहराध्यक्ष मो. हकीम शेठ यांच्या मातोश्री सईदा बी.यांची उपनगराध्यक्षपदी निवडी झाल्याबद्दल काँग्रेस माजी आमदार शिरिष चौधरी यांचे सुपूत्र एनएसयुआयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांनी सईदाबी व मो.हकीम शेठ यांचे अभिनंदन केले. या निवडीत सर्व धर्मीय नगरसेवकांनी सामंजस्याने, एकोपा व सद्भावनेने सहभाग नोंदवत सुंदर उदाहरण निर्माण केले आहे. एकसंघ पाठिंब्यामुळे शहर विकासाला नवीन गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
अतुल पाटील यांची रणनीती यशस्वी
नगरपालिकेत महाविकास आघाडीचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सहा सदस्य व शिवसेना उबाठा गटाचे नगराध्यक्ष सह तीन नगरसेवक निवडून आले होते. हे दोन्ही गट एकत्र येऊन नऊ नगरसेवकांच्या गटाची एकत्र नोंदणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करतील, असे वाटत होते मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे गटाची नोंदणी करताना आघाडीचे नेते अतुल पाटील यांनी रणनीती आखत तीन अपक्ष नगरसेवक त्यांच्याकडे वळविले व त्यापैकी दोन सदस्यांचा समावेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गटात सामील करून त्या गटाची संख्या आठ करून घेतली व शिवसेना उ.बा.ठा. गटात तीन सदस्य असताना त्या गटात अपक्ष नगरसेवक पराग सराफ यांचा समावेश करून उबाठाच्या चार सदस्यांचा गट स्थापन करून घेतला. अशाप्रकारे महाविकास आघाडीचे एकत्रीत संख्या 12 झाली. उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार व भाजपाचे आठ नगरसेवक जरी एकत्र जरी झाले असते तरी त्यांची संख्या 12 इतकी झाली असती. असे झाले असता दोघा उमेदवारांना सम-समान मते पडली असती. समसमान मते झाल्यास लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना अतिरिक्त मतदान करण्याचा अधिकार असल्याने उपाध्यक्ष महाविकास आघाडीचा झाला असता., अशी रणनीती अतुल पाटील यांनी आखली होती. ही खेळी यशस्वी झाली, अशी चर्चा दिवसभर शहरात रंगली.

