जळगावात एकाही जागेवर तुतारी वाजलीच नाही !

निपटून घेण्याची भाषा मतदारांना रुचलीच नाही : 21 जागांवरील उमेदवारांचा दारुण पराभव


गणेश वाघ
भुसावळ (16 जानेवारी 2026)  : जळगाव महापालिका निवडणुकीचे कल हाती येत असून आतापर्यंतच्या निकालानुसार महायुतीला येथे मतदारांनी सत्ता दिल्याचे चित्र आहे. भाजपा-महायुतीला निपटून घेवू म्हणत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना डिवचणार्‍या भुसावळचे माजी आमदार व पक्षाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर संतोष चौधरींच्या नेतृत्वाला अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला जळगावकरांनी येथे नाकारल्याचे दिसून येते.

राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी दिलेल्या सर्व 21 उमेदवारांचा महापालिका निवडणुकीतील भाजपा-महायुती लाटेत येथे दारुण पराभव झाला व साधा भोपळाही उमेदवारांना फोडता आला नाही. उबाठा गटाने 38 जागांवर उमेदवार दिले असलेतरी पाच जागांवर येथे त्यांचे उमेदवार निवडून आले.

भाजपाचा महापौर होणार
महापालिकेत महायुतीतील भाजपचे सहा तर शिंदे सेनेचे सहा उमेदवार मिळून यापूर्वी 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीअंती भाजपचे 46, शिंदेसेनेचे 22, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक, उबाठाचे पाच व अपक्ष एक असे उमेदवार निवडून आल्याने सत्ता प्राप्तीसाठी 38 चा बहुमताचा आकडा आधीच भाजपाकडे असल्याने येथे भाजपाचा महापौर होईल, हे निश्चित आहे. शिवसेना-शिंदे गटाला येथे उपमहापौरपद मिळण्याची शक्यता आहे.

63 जागांसाठी 321 उमेदवार
जळगाव महापालिकेच्या 63 जागांसाठी 15 रोजी निवडणूक झाली. महापालिकेत एकूण 75 जागा असल्यातरी यापूर्वीच 12 जागा बिनविरोध झाल्याने 19 प्रभागांमधील एकूण 63 जागांसाठी 321 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जळगाव महापालिकेमध्ये महापालिकेत महायुतीच्या उमेदवारांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी अशा दोन प्रमुख गटांमध्ये लढत दिसून आली तर अन्य आघाड्या व अपक्षही मैदानात होते.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सर्व उमेदवारांचा दारुण पराभव
जळगाव महापालिका निवडणुकीची जवाबदारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर टाकण्यात आली होती शिवाय पक्षाने त्यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती. चौधरींनी उमेदवारांच्या विजयासाठी व्युह रचना आखली, प्रचारात जोश भरला मात्र भाजपा-महायुतीच्या लाटेत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला व येथे एकाही जागेवर तुतारी वाजलीच नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !