अडीच हजारांची लाच भोवली : धुळ्यातील शांताबाई पिंगळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात
शाळेतील दालनातच स्वीकारली लाच : न्यायालयाने सुनावली एका दिवसांची पोलिस कोठडी
गणेश वाघ
Taking a bribe of two and a half thousand rupees proved costly : The principal of Shantabai Pingale School in Dhule caught in the ACB’s net धुळे (16 जानेवारी 2026) : कालबद्ध पदोन्नतीच्या फरकाचे बिल तसेच पूर्णवेळ ग्रंथपाल झाल्यानंतरचा फरक अदा करण्यासाठीचे बित काढण्यासाठी अडीच हजारांची लाच मागून प्रत्यक्षात दोन हजार 340 रुपयांची लाच स्वीकारताना धुळ्यातील श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती गिरीश जोशी (56, रेल्वे स्टेशन मागे, धुळे) यांना विद्यालयातील त्यांच्या दालनातच धुळे एसीबीने शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत. दरम्यान, जोशी यांना शुक्रवारीच न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार धुळ्यातील शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्णवेळ ग्रंथपाल आहेत. त्यांच्या सेवेला 24 वर्ष पूर्ण झाल्याने कालबद्ध पदोन्नतीच्या फरकाचे बिल तसेच पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर उन्नयन रुपांतर झाल्याच्या पगाराचा फरक अदा करण्यात आला नसल्याने तक्रारदाराने मुख्याधिकारी जोशी यांची भेट घेतली त्यांनी बिले अदा करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागितली व तक्रारदाराने या संदर्भात धुळे एसीबीकडे मंगळवार, 13 रोजी प्रत्यक्ष तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी दुपारी मुख्याधिकारी जोशी यांनी स्वतःच्या दालनात लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एबीसीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, कॉन्स्टेबल मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, महिला कॉन्स्टेबल रेश्मा परदेशी, हवालदार सुधीर मोरे, कॉन्स्टेबल जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

