जनतेचा निर्णय सर्वोच्च : पुण्यातील पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पोस्ट चर्चेत
The people’s verdict is supreme : Deputy Chief Minister Ajit Pawar’s post after the defeat in Pune is being discussed पुणे (17 जानेवारी 2026) : जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो, असे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी आपल्या सोशल मिडीयातील पोस्टमध्ये म्हटले आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतानाच जिथे अपेक्षित यश मिळाले नाही, तिथे आत्मपरीक्षण करून नव्या जोमाने काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेकडे केवळ राजकीय भाष्य म्हणून नव्हे तर पुढील राजकीय वाटचालीचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.
नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे
अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्वप्रथम जनतेच्या निर्णयाला नतमस्तक होत, निवडणुकीत विजय मिळवलेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या.. सत्तेत येणार्या नव्या नगरसेवकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता, नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे आणि विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली..

जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी प्रयत्न करणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वत्र अपेक्षित यश मिळाले नाही, ही बाब अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे मान्य केली आहे. मात्र, या अपयशाकडे ते निराशेच्या दृष्टीने न पाहता, नव्या जबाबदारीच्या रूपात पाहत असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. जिथे जनतेचा अपेक्षित कौल मिळाला नाही, तिथे जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अधिक प्रामाणिकपणे, अधिक जबाबदारीने आणि दुप्पट जोमानं काम करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ही भूमिका राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवणारी मानली जात आहे.
सत्ता ही सेवा करण्याची संधी
अजित पवार यांनी केवळ आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांनाही एक प्रकारचे मार्गदर्शन केले आहे. विजयी उमेदवारांनी आपल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, विकासकामे आणि लोककल्याणाच्या योजनांना गती द्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. सत्ता ही सेवा करण्याची संधी असते, हा अप्रत्यक्ष संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला आहे.

