मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून भुसावळ विभागातील 183 किलोमीटर मार्गाचे इन्स्पेक्शन

विकासकामांचा घेतला आढावा : नांदगावात सेप्टी एक्झीबिशनला भेट : भुसावळ आओएचच्या नव्या इनोव्हेशनचे कौतुक


भुसावळ (17 जानेवारी 2026) : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी शनिवार, 17 रोजी मनमाड-भुसावळदरम्यानच्या 183 किलोमीटर मार्गाचे जीएम स्पेशल रेल्वेद्वारे इन्स्पेक्शन केले. यावेळी त्यांनी विविध स्थानकांना भेट देत सोयी-सुविधांचा आढावा घेतला तसेच काही सूचनाही केल्या.

नांदगावात केली तपासणी
नांदगाव येथे तपासणीदरम्यान महाव्यवस्थापकांनी अत्याधुनिक उच्चगती स्वयंचलित अपघात निवारण रेल्वेगाडीची तपासणी केली तसेच स्थानक इमारत व स्टेशन पॅनल रूम, सर्क्युलेटिंग एरिया, तिकीट कार्यालय व प्रवासी सुविधांची पाहणी केली तसेच क्रू लॉबी, क्रू रनिंग रूम्स, गुड्स शेडची तपासणी केली आणि सेफ्टी प्रदर्शनास भेट दिली. तपासणीदरम्यान गुप्ता यांनी सुरक्षा विभागाचे आपत्ती व्यवस्थापन व त्रैमासिक सुरक्षा बुलेटिन पुस्तिकेचे प्रकाशन केले. महाव्यवस्थापकांनी एसटी विभागाचे निवारण अ‍ॅप, आरएस फ्लॅप व्हॉल्व्ह स्टिम्युलेटर यांचे उद्घाटन केले तसेच ब्रेकिंग पॅटर्न सिस्टम अ‍ॅप व शंटर सेफ्टी अ‍ॅपचे प्रकाशन केले.

पिंपरखेडला तपासणी
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे ट्रॅक्शन सब-स्टेशनची तपासणी केली तसेच हिरापूर येथे महाव्यवस्थापकांनी गँग युनिट क्रमांक, टर्नआउट क्रमांक 102 इ तसेच हिरापूर यार्डमधील लाँग वेल्डेड रेल्स व स्विच एक्स्पान्शन जॉइंट्स यांची तपासणी केली. तसेच ट्रॅकमॅन हँडबुक व टूल बॉक्स टॉक पुस्तिकांचे अनावरण केले.

लेव्हल गेटची तपासणी
चाळीसगाव-वाघळी विभागातील किमी 330/7-9 येथील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 120 ची तपासणी करण्यात आली तसेच वाणिज्य नियमावलीवरील हँडबुकचे अनावरण करण्यात आले. तसेच कजगाव-नगरदेवळा विभागातील किमी 353/713 ते 354/853 येथील वक्र क्रमांक 05 ची तपासणी करण्यात आली.

सबवेची तपासणी
नगरदेवळा-गालळ विभागातील तितूर गिर्डर पूल व गाळण-पाचोरा विभागातील मर्यादित उंचीच्या सबवेची तपासणी करण्यात आली. महाव्यवस्थापकांनी नगरदेवळा-गालन विभागातील किमी 354/29 ते 355/01 येथील तीतूर गिर्डर पूल क्रमांक 354/3 ची संरचनात्मक मजबुती व सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी केली. त्यानंतर गालन-पाचोरा विभागातील किमी 368/03-05 येथील मर्यादित उंचीच्या सबवे ची पाहणी केली.

पाचोरा येथे तपासणी
पाचोरा स्थानक परिसर, उपस्थानक व्यवस्थापक कार्यालय, रेल्वे आरोग्य केंद्र, रेल्वे वसाहत व इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यांची तपासणी करण्यात आली. तसेच संकेत सहाय्यक पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

भुसावळात आरओएच डेपोला भेट
भुसावळात रूटीन ओव्हरहॉलिंग शेड व ओएचई डेपोची तपासणी करण्यात आली तसेच ओएचई डेपोमध्ये दोन बाय 25 केव्ही मॉडेलचे उद्घाटन केले तसेच रेल्वे वसाहत व नवीन अधिकारी विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले.

विविध पुस्तिकांचे लोकार्पण
यावेळी अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती हँडबुक, बदली विनंती संकलन पुस्तिका, विद्युतीकरण कामासाठी हँडबुक, पॉइंट्समनसाठी अभ्यास साहित्य, स्टेशन मास्टरसाठी स्थानक मार्गदर्शिका, स्टेशन मास्टरसाठी कवच प्रशिक्षण हँडबुक, शंटिंगचे सर्वसाधारण नियम माहितीपत्रकाचे लोकार्पण करण्यात आले.

अमृत भारतच्या कामांची तपासणी
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची तपासणी यावेळी करण्यात आली. नांदगाव व पाचोरा स्थानकांवरील अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून प्रवासी सुविधांशी संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महाव्यवस्थापकांनी पाचोरा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली.

स्वच्छता राखण्याचे आवाहन
तपासणीदरम्यान स्वच्छता, गाड्यांचे वेळ पालन, देखभाल कामे व पायाभूत सुविधांच्या उन्नतीचा आढावा घेण्यात आला. अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना सर्वोच्च सुरक्षितता व विश्वासार्हतेची बांधिलकी राखण्याचे तसेच विभागांमधील समन्वय व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या तपासणीदरम्यान भुसावळ डीआरएम पुनीत अग्रवाल, तसेच मुख्यालय व भुसावळ विभागातील प्रमुख विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !