प्रमाणपत्रांच्या पलीकडे जाणारे शिक्षण गरजेचे : शैलेश पाटील

अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते शैलेश पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद : माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे प्रथम पुष्प


भुसावळ (17 जानेवारी 2006) : हुशारी ही केवळ गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रांवरूनच ठरते का ? असा प्रश्न उपस्थित करत व्याख्याते शैलेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. आज प्रमाणपत्रासाठी शिक्षण घ्यावे, असा अट्टाहास केला जातो. मात्र केवळ प्रमाणपत्रासाठी शिक्षण नको, तर आयुष्यभर चालणारे आपले शिकणे प्रमाणित करता आले पाहिजे. सध्या शिक्षित व अशिक्षित यांच्यातील फरक जाणवत नाही. अनेकदा शिकलेले लोकही अडाणीपणाने वागतात, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

अंर्तनादच्या प्रबोधन मालेला सुरूवात
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शनिवार, 17 रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज, भालोद, ता. यावल येथे माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे प्रथम पुष्प भुसावळ येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शैलेश पाटील यांनी गुंफले. ’शिक्षण म्हणजे काय ?’ या विषयावर ते बोलत होते. यंदा व्याख्यानमालेचे आठवे वर्ष होते. विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन हेमलता इंगळे, उपाध्यक्ष गोपाळ चौधरी, जेष्ठ संचालक अरुण चौधरी, पितांबर इंगळे, प्रदीप जावळे, शरद जावळे, प्राचार्य डॉ.के.जी.कोल्हे, मुख्याध्यापक डी.व्ही चौधरी, प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, सहसमन्वयक ललित महाजन उपस्थित होते.

पोट भरणे म्हणजेच शिक्षण नव्हे
पोट भरणे म्हणजेच शिक्षण नव्हे, तर शिक्षणातून जीवनाला अर्थ, समाधान आणि आनंद मिळायला हवा. ‘मी’पेक्षा ‘आम्ही’ ही भावना जोपासली, इतरांच्या आनंदात सहभागी झालो, तर तो आनंद द्विगुणित होतो, असे मत यावेळी चेअरमन हेमलता इंगळे यांनी व्यक्त केले. शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन न राहता, समाजाशी नाते जोडणारे आणि मानवी संवेदना समृद्ध करणारे असावे, असेही त्यांनी नमूद केले.

तुमच्या वर्तनातून समाजाला तुमच्या शिक्षणाची पातळी दिसली पाहिजे. विवेक व सुसंस्कार विकसित झाले नाहीत, तर शिक्षण असूनही सारासार विचार करण्याची क्षमता निर्माण होत नाही, असा सल्ला व्याख्याते शैलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सर्वांग सुंदर जीवन जगण्याची पहिली पायरी म्हणजे शिक्षण होय. समाज झपाट्याने बदलत असला, तरी त्या वेगाने शिक्षणात अपेक्षित परिवर्तन घडत नाही, ही चिंतेची बाब आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते शिक्षण मर्यादित न राहता, चराचर सृष्टीशी नाते जोडणे, जीवनमूल्ये आत्मसात करणे हेच खरे शिक्षण आहे असा सल्ला शैलेश पाटील यांनी या प्रसंगी दिला. महान व्यक्तींच्या विचारांचा आणि प्रेरणादायी वचनांचा आधार घेत त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ केला.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
प्रबोधनमालेसाठी रावेर विधानसभेचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन आणि जळगावचे उद्योजक अजय बढे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन जी.एस.पाटील यांनी केले तर आभार एस.एम.तायडे यांनी मानले. यावेळी अंतर्नाद प्रतिष्ठानचे सदस्य डॉ. संजू भटकर, मंगेश भावे, युवराज सरोदे, हितेश जावळे, गौरव जावळे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !