अक्कलकोटला निघालेल्या पाच मित्रांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावरचालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून अपघात
पुणे (18 जानेवारी 2026) : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट निघालेल्या पाच भाविक मित्रांच्या वाहनाला अपघात झाल्याने सर्व मित्रांचा जागीच मृत्यू झाला. माहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला.
नियंत्रण सुटल्याने कार आदळली
पनवेल (जि.रायगड) येथून सहा मित्र एर्टिगा कारने (क्रमांक एम.एच.46 झेड. 4536) अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. शनिवार, 17 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:30 च्या सुमारास ही कार मोहोळ जवळील देवडी पाटी परिसरात आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही कार महामार्गापासून सुमारे 10 ते 15 फूट दूर झुडपांमध्ये जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली.

पाच जणांचा जागीच मृत्यू
हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला असे एकूण सहा प्रवासी होते. यापैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह वाहनामध्ये पूर्णतः अडकलेल्या अवस्थेत होते. या अपघातातून ज्योती जयदास टाकले (रा.सेक्टर 7, पनवेल) या महिला सुदैवाने बचावल्या.
रात्रीची वेळ आणि वेगाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत व्यक्तींची सविस्तर नावे आणि पत्ते शोधण्याचे काम सध्या पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. हे सर्व जण पनवेल परिसरातील रहिवासी असून ते एकमेकांचे मित्र होते, असे समजते.

