श्रवण, आकलन व चिंतनातून होते मूल्यांची रूजवणूक

भालोद महाविद्यालयातील मूल्यशिक्षण कार्यशाळेत डॉ.जगदीश पाटील यांचे प्रतिपादन


भालोद (18 जानेवारी 2026) : शिक्षण मूल्याधिष्ठित व्हावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याची सवय, सर्जनशीलता, प्रभावी संवाद कौशल्य आणि सहकार्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे. श्रवण, आकलन आणि चिंतन या प्रक्रियेतूनच विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची खरी रूजवणूक होते, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
भालोद गावातील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या भारतीय संस्कृती व संस्कार केंद्रातर्फे आयोजित दोनदिवशीय मूल्यशिक्षण व संस्कृती कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी डॉ.जगदीश पाटील यांनी मूल्यशिक्षणासह भारतीय संस्कृती यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे, उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी, डॉ.सुनील नेवे, डॉ.डिगंबर खोब्रागडे, डॉ.राकेश चौधरी, समुपदेशक आरती चौधरी, शरद झांबरे उपस्थित होते. भारतीय संस्कृती व संस्कार केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी प्रास्ताविक केले. समुपदेशक आरती चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.गीतांजली चौधरी यांनी तर डॉ.राकेश चौधरी यांनी आभार मानले. कार्यशाळेत भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.सक्रिय सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

चिंतन करणे हीच शिक्षणाची खरी दिशा
मूल्यशिक्षण व संस्कृती या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.जगदीश पाटील म्हणाले की, ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे श्रवण होय त्यामुळे विद्यार्थ्यांनी नीट ऐकण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे. जेव्हा आपण लक्ष देऊन ऐकतो, तेव्हा त्यातून योग्य आकलन होते. या आकलनावर विचार करणे आणि त्यावर चिंतन करणे हीच शिक्षणाची खरी दिशा आहे. शिक्षणासोबत भारतीय संस्कारांची जोड मिळाल्यासच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. आजच्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून मूल्याधिष्ठित विचारसरणी आत्मसात करणे अत्यावश्यक आहे.समाजात वावरताना केवळ सहानुभूती न ठेवता समानानुभूती बाळगणे अधिक महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !