आव्हाणे हारदले : किरकोळ वादातून तरुणाला संपवले
Avhane Hardale : A young man was killed over a minor dispute जळगाव (23जानेवारी 2026) : किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणेत घडली. जुना मारुती मंदिर परिसरात गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सागर अरुण बिर्हाडे (32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अशी घडली घटना
आव्हाणे गावातील जुना मारुती मंदिर परिसरात गुरुवारी रात्री सागर बिर्हाडे आणि एका संशयित तरुणामध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात संशयित आरोपीने सागरला जोरात ढकलले. या झटापटीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात सागरला पाहून संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
जागीच झाला मृत्यू
हाणामारीेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सागरला तातडीने गावातील डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली व डॉक्टरांनी त्याला ‘मृत’ घोषित केले.
जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत सागरच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे बिर्हाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे. पसार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना झाली असून जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

