भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात
भुसावळ (27 जानेवारी 2026) : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचा जागर करत विद्यार्थिनींमध्ये मातृभाषेविषयी अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ मराठी विभाग व कला वाड्मय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
या पंधरवड्यात मराठी विभागामार्फत निबंध स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, भित्तिपत्रिका स्पर्धा, पारंपारिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

समारोप प्रसंगी प्रा.विनोद भालेराव यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थिनींमध्ये मराठी भाषेचे वाचन, लेखन आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

मातृभाषा आपल्या संस्कृतीची ओळख
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.जीवन धांडे यांनी मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. मराठी भाषेतूनच आपली संस्कारशक्ती, विचारधारा आणि सामाजिक भान घडते. जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषेचा अभिमान बाळगणे ही काळाची गरज आहे. घर, शाळा आणि समाज या तिन्ही स्तरांवर मराठीचा वापर वाढविला पाहिजे. भाषा जपली तरच संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तरच माणूस समृद्ध होतो. असे प्रतिपादन केले.
गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव
या प्रसंगी विद्यार्थिनींना विविध स्पर्धांचे पारितोषिके वितरित करण्यात आली. त्यात काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक जयश्री सोनवणे यांनी, तर द्वितीय पारितोषिक हर्षाली लोहार यांनी पटकावले. निबंध लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक तेजस्विनी सपकाळे, तर द्वितीय पारितोषिक मेघा सपकाळे यांनी मिळविले.
पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत मयुरी गायकवाड, हर्षाली लोहार, नारायण मोकाशी आणि यामिनी भोई या विद्यार्थिनींनी आकर्षक सादरीकरण करत पारितोषिके पटकावली.
सूत्रसंचालन ऐश्वर्या जवरे तर आभार हर्षाली लोहारने मानले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोपप्रसंगी उपस्थित विद्यार्थिनी, प्राध्यापक व मान्यवरांनी मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाचा संकल्प केला.
यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.गिरीश कोळी, प्रा.पंकज पालक, प्रा.रविकांत वासनिक, प्रा.गिरीश सरोदे तसेच मराठी विभागातील विद्यार्थिनींच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.







