विमानाच्या आकाशात घिरट्या अन् अचानक जमिनीवर आदळले : प्रत्यक्षदर्शींचा थरारक अनुभव ; सर्व मृतांची नावे आली समोर
The plane circled in the sky and then suddenly crashed to the ground : The thrilling experience of eyewitnesses; the names of all the deceased have been revealed बारामती (28 जानेवारी 2026) : बारामती येथे विमान लॅण्डींगदरम्यान अपघात झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, विमानाला अपघात होण्यापूर्वी विमान घिरट्या घालत असल्याचे ते जमिनीवर येताच आदळताच त्याला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश आहे.

कॅप्टन म्हणाल्या, ओह शिट ओह शिट….
विमान कोसळण्यापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते – ओह शिट…ओह शिट. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्या हातात होती.
सकाळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. वैमानिकांनी बारामती विमानतळाच्या रनवे 11 वर उतरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना रनवे दिसला नाही. वैमानिकांनी विमान पुन्हा वर घेतले. थोड्या वेळाने पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विमान रनवेच्या दिशेने सरकले पण रनवेला स्पर्श करण्यापूर्वीच ते उलटले आणि जमिनीवर आदळले.
शेतात कोसळले विमान
अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले आणि आग लागली.
तातडीने बचावकार्य सुरू
अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताची बातमी समजताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेत्यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघातस्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यातून कोणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही.
दुर्घटनेचा थरारक घटनाक्रम
बारामती परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या विमान दुर्घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीतून धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अनेक नागरिकांनी सांगितले की, संबंधित विमान काही वेळ आकाशात घिरट्या घालत असल्याचे दिसत होते. लँडिंगच्या आधी विमानाचा वेग कमी झाला होता मात्र अचानक ते जोरात खाली येताना दिसले. साधारण 100 फूट अंतरावर असताना विमान जमिनीवर आदळले आणि क्षणातच त्याला आग लागली, असे एका स्थानिक व्यक्तीने सांगितले.
अपघात होताच मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. एका महिलेने सांगितले की, आम्ही आवाज ऐकून त्या दिशेने धावलो, पण तोपर्यंत विमानाचा चक्काचूर झाला होता. द शेजारच्या शेतात काम करत असलेल्या एका महिलेनेही थरारक अनुभव कथन केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, विमान प्रथम वरून गेले, पुन्हा वळून आले आणि हळूहळू खाली येऊ लागले. प्रत्येक फेरीत ते अधिकच खाली येत असल्याचे दिसत होते.
महिलेने सांगितले की, विमान धावपट्टीच्या दिशेने झुकलेले दिसत असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर विमानाचे अनेक तुकडे हवेत उडाले आणि जळत्या अवस्थेत ते फिरताना दिसले. स्फोट इतका भीषण होता की, आमच्या घराजवळही विमानाचे अवशेष पडले, असेही त्यांनी सांगितले. स्फोटानंतर घटनास्थळावर धुराचे मोठे लोट उठत होते आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. प्रत्यक्षदर्शींच्या या कथनामुळे अपघाताची तीव्रता आणि अचानकपणा स्पष्ट होत असून, संपूर्ण परिसर हादरून गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान खाली येत असताना त्यातून खूप मोठ्या प्रमाणात आवाज येत होता. विमान या ठिकाणी नेहमीच लँड करते मात्र असा आवाज कधीही आलेला नाही. अगदी जमिनीच्या जवळ आल्यानंतर विमान अचानक तिरपे झाले आणि ते जवळच्या शेतामध्ये कोसळले. विमान कोसळल्यानंतर एका मागे एक असे तीन ते चार स्फोट झाले. अपघात एवढा भीषण होता की, प्रत्यक्षदर्शी जवळ जाईपर्यंत सर्व प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता.







